शामली जिल्ह्य़ात समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीकेलेल्या दारूकामात एक मुलगा मरण पावल्याच्या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते सुनियोजित पद्धतीने करत असलेले हल्ले हे उत्तर प्रदेशात ‘अराजक’ माजल्याचे उदाहरण असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका उमेदवाराच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी पक्षकार्यकर्त्यांनी दारूकामात ८ वर्षांचा एक मुलगा जळून मरफ पावला. एका प्रख्यात दूरचित्रवाहिनीचे वार्ताहर या घटनेचे चित्रीकरण करण्यासाठी गेले असता कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन करून त्यांना बंद करून ठेवले आणि सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याच्या सूचनांनुसार कॅमेऱ्यातील सर्व छायाचित्रे काढून टाकण्यात आली, असा आरोप भाजपचे प्रवक्ते विजयबहादूर पाठक यांनी केला.
पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या हस्तक्षेपानंतर या वार्ताहरांची सुटका करण्यात आली, परंतु या गैरवर्तनासाठी जबाबदार असलेल्या सपाच्या कार्यकर्त्यांवर काही कारवाई करण्यात आली नाही, असे पाठक म्हणाले.