अदाणी समूहातील कंपन्यांबाबत ‘हिंडेनबर्ग रिसर्च’चा अहवाल समोर आल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली. यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षाने संसदेत गोंधळ घालत अदाणी समूहाची संयुक्त संसदीय चौकशीची ( जेपीसी ) मागणी केली. तर, काँग्रेस राहुल गांधी अदाणी समूह प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करत आहेत. अशातच आता भाजपाने ‘काँग्रेस फाइल्स’चा पहिला भाग प्रदर्शित केला आहे.
भाजपाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. त्यावर लिहलं की, ‘काँग्रेसच्या काळात एकामागे-एक कसे घोटाळे झालेत पाहा’. तसेच व्हिडीओत ‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार’ असं शीर्षक देण्यात आलं आहे. ‘काँग्रेसने आपल्या ७० वर्षाच्या काळात जनतेचे ४८,२०,४९,००,००,००० रुपये लुटले आहेत. या पैशांचा वापर जनतेच्या विकासासाठी केला जाऊ शकत होता,’ असेही भाजपाने सांगितलं आहे.
“या पैशांत २४ आयएनएस विक्रांत, ३०० राफेल जेट आणि १ हजार वेळा मिशन मंगल यान मोहिम राबवता आली असती. पण, काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराची किंमत देशाला भोगावी लागत आहे. त्यामुळे देश प्रगतीच्या बाबतीत मागे राहिला आहे,” असेही व्हिडीओत म्हटलं आहे.
“मनमोहन सिंग यांनी या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक केली. त्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार होत राहिला. भ्रष्टाचारांच्या बातम्यांनी वृत्तपत्रांची पान भरली जात होती. हे पाहू भारतीयांनी मान लाजून खाली जात असे,” असं भाजपाने व्हिडीओत सांगितलं आहे.
हेही वाचा : किम जोंग-उन अण्वस्त्रयुद्धाची तयारी करतोय? उत्तर कोरियाच्या याँगब्योनमध्ये हालचाली वाढल्या!
“१.६८ लाख कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा, १.७६ लाख कोटींचा २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, १० लाख कोटी रुपयांचा कॉमनवेल्थ घोटाळा, इटलीबरोबर झालेल्या हेलिकॉप्टर व्यवहारात ३६२ कोटी रुपयांची लाच देण्यात आली,” असे धक्कादायक आरोप भाजपाने काँग्रेसवर केले आहेत.
“हा फक्त काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा ट्रेलर आहे. चित्रपट अजून संपलेला नाही,” असा इशाराही भाजपाने दिला आहे.