SIR चा मुद्दा पुढे आणत राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाने फक्त व्होट चोरी केली आहे बाकी काहीही केलेलं नाही असं राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. एसआयआरच्या पहिल्या यादीतून महाराष्ट्रातल्या दोन कोटी सात लाख मतदारांची नावं वगळली आहेत. यादीत नाव नसलेल्यांना ३० सप्टेंबरपर्यंत तक्रार करता येणार आहे. एसआयआर मोहिमेत महाराष्ट्रातल्या दोन कोटी सात लाख मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. नावं वगळल्यानंतरची पहिली यादी निवडणूक आयोगानं जाहीर केली. मात्र या मतदारांना नाव समाविष्ट करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. मात्र हाच मुद्दा उपस्थित करत राहुल गांधींनी एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे आणि भाजपावर टीका केली आहे.
काय म्हटलं आहे राहुल गांधींनी?
भाजपा आणि व्होट चोरी आयोगाच्या व्होट चोरी करण्याच्या फक्त पद्धती बदलत आहेत. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे कुठल्याही स्थितीत भाजपाचा विजय आणि भारताच्या लोकशाहीचा अंत. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक झाली. त्यात अचानक ३९ लाख मतदार अचानक जोडले गेले. मी तेव्हाही म्हटलं होतं की ही व्होट चोरी होती आजही मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे.
बंगालबाबत काय म्हणाले राहुल गांधी?
बंगाल २०२६ SIR मध्ये ज्या लोकांची नावं वगळण्यात आली. त्यातल्या ९१ टक्के नावांची जोडणी पुन्हा करावी लागली. कारण या सगळ्यांनी पुन्हा एकदा दाद मागितली. ही नावं वगळण्याचा अर्थ होता १० पैकी ९ नावं वगळणं. ही नावंही चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आली होती. मी तेव्हाही म्हटलं होतं आजही सांगतोय ही व्होट चोरीच होती. आता महाराष्ट्रात SIR राबवल्यानंतर २ कोटी ७ लाख नावं ड्राफ्ट लिस्टमधून वगळली आहेत. म्हणजेच प्रत्येक पाचव्या मतदाराला वगळण्यात आलंय.
राहुल गांधी म्हणाले कुठली यादी खरी?
लोकसभा २०२४- महाराष्ट्रात ९ कोटी २९ लाख मतदार
विधानसभा २०२४- महाराष्ट्रात ९ कोटी ७० लाख मतदार
SIR २०२६ : महाराष्ट्रात ७ कोटी ७८ लाख मतदार
जर असं चित्र असेल तर मग कुठली मतदार यादी खरी होती? व्होट चोरीतून जे सरकार उदयास आलंय त्यांना जनता महत्त्वाची नाहीच. त्यामुळे भाजपाचं जनता ऐकतही नाही आणि त्यांना जुमानतही नाही. असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी राहुल गांधींची ही पोस्ट रिपोस्टही केली आहे. आता यावर महाराष्ट्र सरकारकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
