Suvendu Adhikari named West Bengal New CM: पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दोन वेळा निवडणुकीत पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी हेच आता नवे मुख्यमंत्री होणार आहेत. पश्चिम बंगाल भाजपाने याची घोषणा शुक्रवारी केली. पश्चिम बंगालच्या सत्ता स्थापनेचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोलकाता येथे आले होते. त्यांच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

कोलकाता येथील बिस्वा बांगला कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भाजपाच्या पश्चिम बंगाल कार्यकारिणी आणि नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य उपस्थित होते. या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

या बैठकीत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, निवडणुका संपल्या असून पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. आता सर्वांनी एकच नाव पुढे केले आहे. दुसरे नाव निवडण्यासाठी नेत्यांना वेळ देण्यात आली, मात्र दुसऱ्या कुणाचेही नाव पुढे आले नाही. यामुळे आता सुवेंदू अधिकारी हेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी यांनी २०२१ साली नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यानंतर पाच वर्ष त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा तब्बल १५ हजार मतांनी दणदणीत पराभव केला.

कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

सुवेंदू अधिकारी यांना एक प्रतिष्ठिती राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. सुवेंदू यांचे वडील शिशिर अधिकारी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए-२ सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिले होते. शिशिर यांना सुवेंदू, दिब्येंदू आणि सौमेंदू अशी तीन मुले आहेत. तिघेही राजकारणात सक्रिय आहेत.

सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास

सुवेंदू अधिकारी यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेपासून राजकीय जीवनाचा प्रवास सुरू केला. सुवेंदू अधिकारी जेव्हा राजकारणात आले तेव्हा बंगालमध्ये डाव्यांची सत्ता होती. १९९५ साली सुवेंदू अधिकारी पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९८ साली जेव्हा ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा सुवेंदू अधिकारी या पक्षात आले. २००६ मध्ये ते कांथी दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. एका वर्षानंतर, ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम आणि सिंगूरमधील जमीन अधिग्रहण विरोधी आंदोलनादरम्यान त्यांना मुख्य संघटक बनवण्यात आले. अधिकारी यांनी ‘भूमी उच्छेद प्रतिरोध समिती’चे नेतृत्व करत नंदीग्राममधील आंदोलनाचे सारथ्य केले. या आंदोलनाने बंगालमधील डाव्या आघाडीची ३४ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आणि २०११ मध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री बनल्या.

Suvendu Adhikari set to be West Bengal Chief Minister
भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी पुन्हा एकदा ‘जायंट किलर’ ठरत ममता बॅनर्जींचा १५,१०५ मतांनी पराभव केला. (बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे सहकारी असलेले सुवेंदू अधिकारी २०२० साली भाजपात आले होते. त्यानंतर पुढच्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपाचे नेतृत्व करत भाजपाचे पहिल्यांदाच ७७ आमदार निवडून आणण्याची किमया करून दाखवली होती.

राज्यपालांकडून विधानसभा विसर्जित

विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. निवडणूक निकाल हे जनमताचे प्रत्यंतर नसून, ते निवडणूक आयोगाने भाजपच्या साथीने रचलेले षड्यंत्र असल्याचा आरोप ममतांनी केला होता. अखेर बुधवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी विधानसभा विसर्जित केली. त्यानंतर पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकार अधिकृतपणे संपुष्टात आले.

भाजपाकडून कोणती नावे चर्चेत

स्वपन दासगुप्ता

सुवेंदू अधिकारी यांच्याबरोबरच भाजपामधून इतरही काही जणांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होती. स्वपन दासगुप्ता यांचेही नाव चर्चेत होते. माजी पत्रकार असलेल्या दासगुप्ता यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या प्रचार मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला होता. दासगुप्ता हे बंगाल भाजपामधील अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा म्हणून ओळखले जातात. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विशेषतः दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या ते अत्यंत जवळचे मानले जात होते.

दिलीप घोष

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत दिलीप घोष हे एक महत्त्वाचे नाव आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला शून्यातून विश्व निर्माण करून देण्यात घोष यांचा मोलाचा वाटा मानला जातो. २०१६ मध्ये जेव्हा भाजपाकडे केवळ तीनच आमदार होते, तेव्हापासून दिलीप घोष यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळली. त्यांच्याच कार्यकाळात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४२ पैकी १८ जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती.

सुकांत मजूमदार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सुकांत मजूमदार यांचेही नाव आघाडीवर होते. मजूमदार यांनी यापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून, सध्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून कार्यरत आहेत. केंद्रीय मंत्री म्हणून काम करत असल्यामुळे मजूमदार यांच्याकडे प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे, जो राज्याचे नेतृत्व करताना त्यांना उपयुक्त ठरू शकतो, असा कयास लावला जात होता.