नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी ९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीवरून प्रबळ प्रदेश नेत्यांना केंद्रात आणून राज्यांमध्ये नेत्यांची नवी फळी तयार केली जात असल्याचे संकेत दिले गेले आहेत.
भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष नितीन नवीन यांना राज्यसभेची उमेदवारी अपेक्षितच होती. ते वरिष्ठ सभागृहाचे सदस्य झाल्यानंतर त्यांच्या बिहारमधील बांकीपूर मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागेल. नवीन यांच्या उमेदवारीमुळे कायस्थ समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात आले असून दलित समाजातील शिवेश राम यांना संधी देण्यात आली आहे. बिहारमधून ‘एनडीए’तील घटक पक्ष राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी स्वतःच्या नावाची घोषणा केली असून त्यांना ‘एनडीए’चा पुन्हा पाठिंबा मिळू शकेल. बिहारमध्ये ५ जागांवर निवडणूक होत आहे.
पश्चिम बंगाल, ओदिशा, आसाम या राज्यांतून विद्यामान आमदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने राहुल सिन्हा या आक्रमक नेत्याला संधी दिली आहे. सिन्हा यांना विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र यश मिळालेले नाही. या राज्यात ५ जागा रिक्त होत आहेत.
ओदिशामध्ये ४ जागांवर निवडणूक होत असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल तर, विद्यमान राज्यसभा सदस्य सुजीत कुमार यांना संधी दिली आहे. आसाममध्ये विद्यमान मंत्री जोगेन मोहन व आमदार तेरश गाव्ला यांना दिल्लीच्या राजकारणात उतरवले जात आहे. तिथे ३ जागा रिक्त झाल्या आहेत. हरियाणामधून पक्ष संघटनेवर पकड असलेले संजय भाटिया तर छत्तीसगढमध्ये लक्ष्मी वर्मा यांना संधी देण्यात आली आहे.
