scorecardresearch

‘या’ ट्वीटवरून राहुल गांधींविरोधात १,००० पोलीस तक्रारी, आसाम भाजपाचा दावा

आसाम भाजपा आणि त्यांच्या वेगवेगळ्या विभागांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात शेकडो पोलीस तक्रारी दाखल केल्या आहेत.

आसाम भाजपा आणि त्यांच्या वेगवेगळ्या विभागांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात शेकडो पोलीस तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारीत भाजपाने राहुल गांधी यांच्या मागील आठवड्यातील एका ट्वीटमुळे सामाजिक सौहार्द बिघडत असल्याचा आरोप केलाय. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विस्वा शर्मा यांनी राहुल गांधींवर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने आसाममध्ये ठिकठिकाणी आंदोलन केले. तसेच देशात वेगवेगळ्या राज्यात शर्मा यांच्याविरोधात पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या. यानंतर भाजपाकडून या तक्रारी दाखल करण्यात येत आहेत.

राहुल गांधी यांनी स्पिरिट ऑफ इंडिया या आपल्या ट्वीटमध्ये इशान्य भारतातील राज्यांचा उल्लेख केला नाही. यातून त्यांनी या राज्यांना उर्वरित भारतापासून वेगळं केलं आहे आणि समाजातील सौहार्द बिघडवलं आहे, असा आरोप भाजपाने केलाय.

राहुल गांधी यांनी नेमकं काय ट्वीट केलं होतं?

राहुल गांधी यांनी १० फेब्रुवारीला आपल्या ट्वीटमध्ये एकतेची ताकद सांगितली. ते म्हणाले, “सांस्कृतिक एकता, विविधतेतील एकता, भाषेतील एकता, लोकांची एकता, राज्यांची एकता असं म्हटलं. तसेच काश्मीरपासून केरळपर्यंत आणि गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत भारत त्याच्या प्रत्येक रंगात सुंदर दिसतो. भारताच्या आत्म्याचा अपमान करू नका.”

हेही वाचा : “तुम्ही राजीव यांचे पुत्र असल्याचा आम्ही पुरावा मागितला का?”; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं राहुल गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

भाजपाने राहुल गांधी देशाच्या सीमांबाबत चीनचा अजेंडा रेटत आहेत, असा आरोप केला. भारतीय जनता युवा मोर्चाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राहुल गांधींनी भारताचं वर्णन करताना इशान्य भारतातील राज्यांचा उल्लेख केलेला नाही. तसेच यामुळे एकता आणि अखंडता याला धोका निर्माण झाल्याचाही दावा करण्यात आलाय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp assam claim about filing 1000 police complaint against rahul gandhi pbs