BJP Assam Minister faces backlash over post Bihar approves Gobi farming : आसामचे भाजपाचे मंत्री अशोक सिंघल यांनी नुकतेचे सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कोबीच्या शेताचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यांनी या फोटोला ‘बिहार अप्रूव्ह्ज गोबी फार्मिंग’ असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टवर सोशल मीडियावर सडकून टीका केली जात आहे. अनेक वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की ही पोस्टचा संदर्भ १९८९ च्या भागलपूर दंगली वेळच्या ‘फुलकोबी दफन प्रकरण’ याच्याशी आहे. या घटनेला लोगैन हत्याकांड (Logain massacre) म्हणून ओळखले जाते.
ही घटना स्वातंत्र्य भारतात झालेली सर्वात भीषण हिंदू-मुस्लिम हिंसाचाराच्या घटनांपैकी एक आहे, ज्यामध्ये १०० हून अधिक मुस्लिमांची हत्या करण्यात आली होती आणि गुन्हा दडवण्यासाठी त्यांना पुरण्यात आलेल्या शेतात कोबीची रोपे लावण्यात आली होती. सिंघल यांच्या पोस्टमधील या संदर्भाने लगेचच लोकांचे लक्ष वेधून घेतले. अनेक वापरकर्त्यांनी सरकारमध्ये एका पदावर असलेल्या मंत्र्याच्या या पोस्टचा निषेध केला आहे.
सोशल मीडियावर अनेकांनी याचा निषेध केला आहे.
एका वापरकर्त्याने संदर्भ देताना लिहिले की, “संदर्भ: भाजपाच्या असाम येथील मंत्र्याने पोस्ट केलेला कोबीच्या शेताचा फोटो हा हिंदू कट्टरतावाद्यांनी १९८९ च्या भागलपूर येथे झालेल्या मुस्लिमांच्या सामूहिक हत्येचे उदात्तीकरण करण्यासाठी वापरला आहे, जिथे पुरावे लपवण्यासाठी दफन केलेल्या जागेवर कोबीची रोपे लावण्यात आली होती.” अनेकांनी एक कॅबिनेट मंत्री अशा प्रकारची पोस्ट करू शकतो याबद्दल अविश्वास व्यक्त केला आहे. अनेकांनी ही पोस्ट करण्यात आलेले खाते हे अधिकृत असल्याचेही नमूद केले आहे.
लोगैन हत्याकांडाचा इतिहास
२४ ऑक्टोबर १९८९ मध्ये येथे हिंसाचार उसळला होता आणि तो भागलपूर शहर आणि आजूबाजूच्या २५० गावांमध्ये हा हिंसाचार जवळपास दोन महिने सुरू होता.
या हिंसाचारात सुमारे १,००० हून अधिक लोक मारले गेले, ज्यात सुमारे ९०० मुस्लिम होते, तर अंदाजे ५०००० लोक विस्थापित झाले. लोगैन गावात, एएसआय रामचंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील ४००० लोकांच्या जमावाने ११६ मुस्लिमांची हत्या केली. त्यांचे मृतदेह पुरण्यात आले आणि पुरावे लपवण्यासाठी त्या जमिनीवर कोबी व पत्ताकोबीच्या रोपांची लागवड करण्यात आली.
२००७ मध्ये, या हत्याकांडातील सहभागासाठी माजी पोलीस अधिकाऱ्यासह १४ जणांना दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
तेव्हापासून सोशल मीडियावर कोबीचा संदर्भ हा या हत्याकांडाचे प्रतिक म्हणून जोडला जातो, यामुळे सिंघल यांची पोस्ट अत्यंत वादग्रस्त ठरली आहे.
