राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू जिंकल्या आहेत. द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती बनणार असून, त्या पहिल्या आदिवासी-महिला राष्ट्रपती ठरतील. दरम्यान उमेदवारीसाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर टीका करणाऱ्यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी उत्तर दिलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी विरोधकांना आता जुन्या मानसिकतेतून बाहेर पडा असा सल्ला दिला आहे.

“हा ऐतिहासिक निर्णय असून, सोनेरी क्षण आहे. आदिवासी समाजातील आमची माता राष्ट्रपती होईल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा आमच्यासाठी तो आश्चर्याचा धक्का होता. त्यांच्या विजयाचा क्षण आदिवासी समाजाची मुलगी म्हणून आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. आम्ही सर्व या क्षणाचे साक्षीदार आहोत याचा आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीचा निर्णय घेतल्याने मी त्यांची आभारी आहे,” असं भारती पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू ; ६४ टक्के मतांसह विजय, आदिवासी समाजातील पहिली व्यक्ती सर्वोच्चपदी

द्रौपदी मुर्मू यांना अधिक मतं मिळायला हवी होती का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की “आणखी मतं मिळतील अशी आशा होती. विरोधक राजकारण बाजूला ठेवून आदिवासी समाजाला प्राधान्य देतील असं वाटलं होतं. पण दुर्दैवाने त्याला राजकीय रंग देण्यात आला. फक्त भाषणांमध्ये आदिवासी समाजाला पुढे आणलं पाहिजे सांगायचं, पण मतदानात राजकारण आडवं येतं हे आदिवासी समाज पाहत आहे. हा राजकीय आखाडा नसतानाही तिथे आम्हाला संघर्ष करावा लागत आहे”.

पाहा व्हिडीओ –

ज्यांना आवाज नाही त्यांची का निवड होत आहे? अशी विचारणा तेजस्वी यादव यांनी केली होती. त्यासंबंधी बोलताना भारती पवार म्हणाल्या की, “या वक्तव्यावर माझा आक्षेप आहे. तुम्ही त्यांचा इतिहासच वाचलेला नाही. भारतमाता आणि समाजसेवेसाठी त्या किती समर्पित आहेत हा इतिहासच वाचला नसेल तर तुमचं वक्तव्य दुर्दैवी आहे. विनावेतन त्यांनी शिक्षणाचं काम सुरु केलं होतं. माझा वेळ मुलांच्या शिक्षणासाठी दिला तर पुढील पिढीला सक्षम करता येईल असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे रबर स्टॅम्प वैगैरे या संकल्पना आता गेल्या आहेत, आता ते दिवस गेले आहेत”.

मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीतच मुर्मू यांनी विजयासाठी आवश्यक मतांचा जादुई आकडा गाठला. मुर्मू यांना ६४.०३ टक्के, तर सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली. द्रौपदी मुर्म यांनी ६,७६,८०३ इतके मतमूल्य मिळवून विजय मिळवला, तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या पारडय़ात केवळ ३,८०,१७७ इतके मतमूल्य जमा झालं.