राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी, अशी घोषणाबाजी या खासदारांनी संसदेतील महात्मा गांधींच्या पुतळय़ासमोर उभे राहून केली. सकाळच्या सत्रात दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब झाल्यानंतर भाजपच्या ओबीसी खासदारांनी विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. राहुल गांधींच्या बडतर्फीच्या निषेधार्थ सोमवारी विरोधकांनी मोर्चा काढला होता.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ओबीसी समाजापर्यंत पोहोचण्याची माहीम राबवली जात आहे. ‘मोदी सरकारच्या ९ वर्षांमध्ये ओबीसी समाजाचा मोठा विकास झाला असून काँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात ओबीसी समाजाकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले. ओबीसींच्या नावाने प्रादेशिक पक्षही स्थापन झाले पण, त्यांनी फक्त स्वत:च्या कुटुंबाचे भले केले’, असे भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. लक्ष्मण यांनी सांगितले.
ओबीसींचा अपमान केला म्हणून शिक्षा -स्मृती इराणी
राहुल गांधींनी संसदेत मोदींशी उद्धटपणा केला, त्यांच्यावर आरोप केले. पण, स्वत:च्या स्वाक्षरीने त्यांनी विधानाची पडताळणी केली नाही. आपण कोणालाही घाबरत नसल्याचा आव आणला असला तरी, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली होती. कोणा व्यक्तीशी गैरवर्तन केले म्हणून नव्हे तर, ओबीसी समाजाचा अपमान केला म्हणून न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आहे, अशी टीका केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
मोहिमेचे स्वरूप काय?
- भाजपचा ओबीसी मोर्चा ‘गावागावांत-घरोघरी चला’ ही मोहीम राबवणार
- पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डांच्या हस्ते हरियाणातील मानेसरमधून सुरुवात
- सर्व राज्यांतील १ लाख गावांमधील १ कोटी घरांमध्ये कार्यकर्ते पोहोचणार
- ओबीसी समाजासाठी मोदी सरकारने केलेल्या कामांची व योजनांची माहिती देणार.