नरेंद्र मोदी यांच्या जिवावर लोकसभा निवडणुकीत एकहाती यश संपादन करणाऱ्या भाजपला अवघ्या तीन महिन्यांतच जोरदार झटका बसला आहे. चार राज्यांत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी भाजपच्या विरोधात कौल दिला असून काँग्रेस, राजद आणि संयुक्त जनता दलाला ‘अच्छे दिन’ अनुभवायला मिळाले आहेत. निकालांमुळे चार राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांमध्येही चुरस निर्माण होणार आहे.
बिहारसह मध्य प्रदेश, पंजाब आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये एकूण १८ जागांसाठी झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि घटक पक्षांनी १० जागा पटकाविल्या आहेत, तर भाजपने सात जागा पटकाविल्या असून एक जागा शिरोमणी अकाली दलाने पटकावली आहे. या १० जागांसाठी २१ ऑगस्ट रोजी मतदान झाले होते.
बिहारमध्ये राजद, संयुक्त जनता दल आणि काँग्रेस आघाडीने भाजपला ६-४ असे पराभूत केले. कर्नाटकातील तीन जागांपैकी बेल्लारी आणि चिक्कोडी सदल्गा या दोन जागा तर मध्य प्रदेशात तीनपैकी बाहोरीबंद ही जागा काँग्रेसने पटकावली आहे. पंजाबमध्येही दोनपैकी एक जागा काँग्रेसने पटकावली आहे.  
बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत ४० पैकी ३३ जागा पटकाविणाऱ्या भाजपला विधानसभा पोटनिवडणुकीत चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. संयुक्त जनदा दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांनी धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापून भाजपशी टक्कर दिली होती. राजनगर, छाप्रा आणि मोहिउद्दीननगर या जागा राजदने, जाले आणि परबट्टा या संयुक्त जनता दलाने आणि भागलपूरची जागा काँग्रेसने पटकावली आहे.
कर्नाटकमध्ये सत्तारूढ काँग्रेसने दोन जागा पटकाविल्या असून त्यात अत्यंत प्रतिष्ठेची बेल्लारी (ग्रामीण) ही जागा भाजपकडून हिसकावल्याने उपाध्यक्ष झालेल्या येडियुराप्पांना धक्का बसला आहे. काँग्रेसचे एन. वाय गोपाळकृष्ण यांनी बेल्लारीत बी. श्रीरामलू यांचा पराभव केला.
पंजाबमध्ये पतियाळा ही अत्यंत प्रतिष्ठेची जागा माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांची पत्नी प्रणितकौर यांनी पटकावली आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपकडून बोहोरीबंद जागा पटाकावली आहे. भाजप आमदार प्रभात पांडे यांच्या निधनामुळे तेथे पोटनिवडणूक झाली आणि त्यात पांडे यांचा पुत्र प्रणव याला भाजपने उमेदवारी दिली होती.

जनतेचा कौल आम्हाला मान्य असून आम्ही त्याचा स्वीकार करतो. या निकालांचा आढावा घेऊन बिहारमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीेसाठी आमच्या प्रयत्नांमध्ये आम्ही सुधारणा करू. – सुशीलकुमार मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराला जनता विटली असल्याचे या निकालांवरून स्पष्ट होत आहे. त्यांच्या अहंकाराला सदसद्विवेकबुद्धीने केलेल्या मतदानातून जनतेने उत्तर दिले आहे.
नितीश कुमार</strong>