तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मतदार संघातून उमेदवारी दाखल केल्याबद्दल भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी आक्षेप नोंदविला आहे. तृणमूल कॉंग्रेसचे माजी नेते आणि भाजपाचे उमेदवार सुवेंदु अधिकारी हे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम येथून बॅनर्जी यांच्याविरोधात उभे आहेत.

सुवेंदू अधिकारी यांचे म्हणणे आहे की ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावरील सहा फौजदारी खटल्यांचा उल्लेख न करता प्रतिज्ञापत्र सादर केले. यासंदर्भात मी निवडणूक आयोगाकडे (ईसी) तक्रार दिली आहे, असे सुवेन्दु अधिकारी यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

“ममता बॅनर्जी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सहा फौजदारी खटल्यांचा उल्लेख केलेला नाही. यात २०१८ मध्ये आसाममधून दाखल झालेल्या पाच एफआयआर आणि एक सीबीआय एफआयआर समाविष्ट आहे,” असे सुवेंदु अधिकारी यांनी सांगितले. अधिकारी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टीएमसीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा संदर्भ देताना सुवेंदू अधिकारी म्हणाले की पाच एफआयआरपैकी एक फेटाळून लावण्यासाठी त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती पण त्यांची याचिका फेटाळून लावली. अधिकारी यांचे म्हणणे आहे की त्यांनी सर्व पुरावे निवडणूक आयोगाकडे दिले आहेत आणि आयोग या प्रकरणात लक्ष घालेल असा त्यांना विश्वास आहे.