scorecardresearch

फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात भाजपची ठोस पावले?; शहा, नड्डा, विधिज्ञांशी दिवसभर चर्चा

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केलेला दिल्लीदौरा गोपनीय न ठेवल्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षांत भाजपकडून ठोस पावले उचलली जात असल्याचे चित्र निर्माण झाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांची भेट घेतली.

नवी दिल्ली: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केलेला दिल्लीदौरा गोपनीय न ठेवल्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षांत भाजपकडून ठोस पावले उचलली जात असल्याचे चित्र निर्माण झाले. राज्यात पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून दावा केला जाऊ शकतो, असे तर्कवितर्क केले जात आहेत.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्रतेपासून दोन आठवडय़ांचे अभय सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर, भाजपच्या सुकाणू समितीची महत्त्वाची बैठक मुंबईत झाली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास फडणवीस हे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांच्यासह दिल्लीत येऊन दाखल झाले. शिंदे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिलांचा ताफा युक्तिवाद करत असून या प्रकरणामध्ये जेठमलानीही कायदेशीर सल्ला देत आहे. राज्यातील सत्तासंघर्षांत अनेक कायदेशीर पेच निर्माण झाले असल्याने फडणवीस यांनी जेठमलानी यांनाही दिल्लीत येण्याची विनंती केली होती. फडणवीस व जेठमलानी यांनी अधिवक्ता तुषार मेहता, ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी व अन्य कायेदपंडितांचीही भेट घेतल्याचे समजते.

फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी जाऊन राज्यातील राजकीय घडामोडींची चर्चा केली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केल्याचे समजते. शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरतला गेल्यापासून (२० जून) गेल्या आठ दिवसांमध्ये फडणवीस यांनी चार वेळा दिल्लीत येऊन शहा व नड्डा यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. या भेटींमध्ये दिल्लीतील त्यांचा ठावठिकाणा गोपनीय ठेवण्यात आला होता. मात्र, मंगळवारी दिवसभर फडणवीस यांनी सत्तासंघर्षांतील राजकीय व कायदेशीर मुद्दय़ांसंदर्भात उघडपणे गाठीभेटी घेतल्या.

शिंदे गटाने तसेच, राज्यातील भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचा दावा करत पर्यायी सरकार स्थापनेच्या हालचाली नजिकच्या काही दिवसांमध्ये होऊ शकतात, असे सुतोवाच केले. तसेच, गुवाहाटीतील आमदार लवकरच मुंबईत परत जातील, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. या पार्श्वभूमीवर, फडणवीस मंगळवारी दिल्लीत आल्यामुळे भाजपकडून राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

कोणत्या मुद्दय़ांवर चर्चा?

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात १२ जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. पण, तोपर्यंत विधानसभेत महाविकास आघाडीविरोधात अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो का, शिंदे गटाचे कायदेशीर अस्तित्व काय असू शकते, या गटाने सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र राज्यपालांना देता येईल का, संभाव्य अविश्वास ठरावावेळी शिंदे गट मतदानात सहभागी होऊ शकतो का, महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असेल तर, भाजप सरकार स्थापनेचा दावा करू शकतो, त्यासाठी पुरेसे संख्याबळ आहे का, अशा अनेक किचकट मुद्दय़ांवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर भाजपकडून राजकीय हालचाली केल्या जाऊ शकतात. त्यामुळे फडणवीस यांच्या मंगळवारी झालेल्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या भेटी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

अखेर उघड भूमिका

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गेले आठवडाभर मौन बाळगणाऱ्या भाजपने अखेर उघडपणे भूमिका घेतली आणि सरकारने बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी राज्यपालांकडे केली.

  • शिंदे यांच्या बंडानंतर भाजपने पडद्याआडून सारी सूत्रे हलविली होती. शिंदे यांचे बंड हा शिवसेनेचे अंतर्गत प्रश्न आहे व त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात येत होता. शिंदे यांच्या बंडाला भाजपची सारी फूस असल्याचे सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले होते. शिंदे यांच्याबरोबरील आमदारांनी आधी सूरत गाठणे व नंतर गुवाहटीला जाणे हे भाजपच्या पािठब्यावर सारे सुरू असल्याचे बघायला मिळाले. गुवाहाटीमध्ये स्थानिक भाजप नेते मदतीला तैनात होते.  भाजपने या वादापासून दूर राहण्याचे धोरण ठेवले होते. पक्षाच्या नेत्यांना या वादाबद्दल अवाक्षरही काढू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. भाजपचे नेते माध्यमांसमोर येण्याचे टाळत होते. एकनाथ शिंदे यांना दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ प्राप्त व्हावे याकडे भाजप नेत्यांचे बारीक लक्ष होते. शिंदे यांना शिवसेनेच्या ३९ आमदारांचे संख्याबळ प्राप्त झाले. आणखी संख्या बाढण्याची नव्हती.  जास्त दिवस ताणणे हे भाजप आणि शिंदे यांच्यासाठी उपयुक्त नव्हते.  फडणवीस हे सकाळी नवी दिल्लीला गेले होते. तेथे पक्षाचे नेते अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. दिल्लीतून परतल्यावर फडणवीस यांनी राजभवन गाठले. दिल्लीत खल झाल्यावर भाजपने उघडपणे भूमिका घेतली.
  • उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपने आधीपासूनच प्रयत्न केले होते. पण त्यात भाजपला यश येत नव्हते. कोणताही एक पक्ष फुटल्याशिवाय सरकार पडणे कठीण होते. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा भाजपने फायदा उठविला. फडणवीस आणि शिंदे यांच्यात संबंध सलोख्याचे होते. शिंदे यांनी तयारी दर्शविल्यावर भाजपने त्यांना सारी मदत केली. शिंदे यांना सारी मदत करण्यात आली. पुरेसे संख्याबळ होईल या करिता मदत करण्यात भाजपचीच मंडळी होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp concrete fadnavis delhi tour discussion shah nadda lawyers ysh

ताज्या बातम्या