Gujarat : भाजपाच्या एका नेत्याने माझा हात पकडला आणि मला व्यासपीठावरून धक्का दिला, असा आरोप गुजरातमधील भाजपाच्या नगरसेविका रुपल मेहता यांनी केला आहे. ४ सप्टेंबर रोजी गुजरातमधील पूरपरिस्थितीदरम्यान नागरिकांना अत्यावश्यक वस्तू वाटप करताना, हा प्रकार घटल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार केली असून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचंही त्या म्हणाल्या. रुपल मेहता यांच्या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळातही विविध चर्चांना उधाण आलं आहे.

रुपल मेहता नेमकं काय म्हणाल्या?

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपाच्या नगरसेविका रुपल मेहता यांनी त्यांच्याच पक्षाचे नेते करसन भरवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “भारतीय जनता पक्षाने ४ सप्टेंबर रोजी पूरग्रस्त भागात अत्यावश्यक वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी मी माझा काही समर्थकांसह व्यासपीठावर होते. तेव्हा आमच्या पक्षाचे नेते करसन भारवाड यांनी व्यासपीठावर येत माझा हात पकडला आणि मला व्यासपीठावरून धक्का दिला”, असं रुपल मेहता म्हणाला.

हेही वाचा – Vadodara Politics : भाजपाला वडोदरामध्ये लोकांच्या रोषाचा सामना का करावा लागतोय? जनतेच्या संतापाचं कारण काय?

“व्यासपीठावरील वरिष्ठांनी त्यांना थांबवलं नाही”

पुढे बोलताना, “करसन भारवाड यांनी मला व्यासपीठावरून धक्का देताना तुझी इथे गरज नाही, असंही म्हटलं. त्यावर उत्तर देताना तुम्ही हे मला व्यासपीठावरही सांगू शकला असता, असं मी सांगितलं. मात्र, त्यांनी काहीही न बोलता मला धक्का दिला. यावेळी पक्षाचे काही वरिष्ठ नेतेही या ठिकाणी उपस्थित होते. मात्र, त्यांनी करसन यांना माझा अपमान करण्यापासून थांबवलं नाही, सगळे शांतपणे उभे राहून तमाशा बघत होते”, अशी माहितीही त्यांनी दिली.

“मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली, पण…”

“याप्रकरणी मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार दाखल केली असून त्यांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. मी पक्षाच्या नेत्यांना आणखी थोडा वेळ देत आहे. त्यांनी यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी”, अशी मागणीही रुपल मेहता यांनी केली. यासंदर्भात बोलताना, “गुजरात भाजपाचे उपाध्य गोर्धन जदाफिया म्हणाले, आम्ही याप्रकरणाची दखल घेतली असून यासंदर्भात पक्ष योग्य ती कारवाई करेल.”

हेही वाचा – Rajkot Rape Case : बलात्कार करून फरार झालेला भाजपा कार्यकर्ता ४० दिवसांनंतर गजाआड, न्यायालयाचाही दणका

विश्वामित्री बचाव समितीने घेतली दखल

विश्वामित्री बचाव समितीनेही या प्रकरणाची दखल घेत शनिवारी वडोदरा पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले. “मेहता यांनी केलेला आरोप गंभीर आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीरपणे दखल घेत आरोपीविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे” असं त्यांनी म्हटलं.