सोमनाथ मंदिराच्या ‘स्वाभिमान पर्वा’च्या निमित्ताने भाजपने पुन्हा एकदा पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली. पं. नेहरूंनी १९५१ मध्ये सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला विरोध केला होता. तरीही ही पुनर्बांधणी देशाच्या राष्ट्रीय आकांक्षेचे प्रतीक ठरली, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

सोमनाथ मंदिरावर मोहम्मद गझनीने केलेल्या पहिल्या आक्रमणाला १ हजार वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने ८ ते ११ जानेवारी यादरम्यान ‘स्वाभिमान पर्वा’अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. पंतप्रधान मोदीही ११ तारखेला सोमनाथ मंदिराला भेट देणार आहेत. “मंदिराच्या पुनर्प्रतिष्ठापनेनंतर भारत पुन्हा ऐतिहासिक वैभवाकडे वाटचाल करेल अशी अपेक्षा तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी व्यक्त केली होती. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत असून प्रसाद यांचे स्वप्न साकार होत आहे”, असा दावा त्रिवेदींनी केला.

त्रिवेदी यांनी पंडित नेहरूंच्या इतिहासाच्या मांडणीवरही टीका केली. नेहरूंच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथात मोहम्मद गझनीला कलेचा प्रेमी म्हटले आहे. केवळ संपत्ती मिळवण्यासाठी त्याने मोहिमा केल्या, असे लिहिले आहे. मात्र ‘तारीख-ए-यामिनी’ यासारख्या ऐतिहासिक दस्तऐवजांतून गझनीने मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट होते. मंदिराचे पुजारी व स्थानिक राजाने लाखो सोन्याची नाणी देऊन शिवलिंगाला अभय देण्याची विनंती केली होती, मात्र गझनीने प्रस्ताव फेटाळला. त्यावरून गझनीचा हेतू धार्मिक विद्ध्वंसाचाही होता, असाही दावा त्रिवेदींनी केला.

१८३५ मध्ये मॅकॉलेने भारतीय समाजाच्या मनात पेरलेले विचार आजही तसेच आहेत. मोदी यांनी २०३५ पर्यंत ही वैचारिक गुलामगिरी संपवण्याचा संकल्प केला आहे. सोमनाथ मंदिर हे या विषारी वेलीला मुळापासून छाटण्याचे व भारतीय इतिहासाचे खरे स्वरूप पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीचे प्रतीक आहे, असा दावा त्रिवेदींनी केला.