Vande Mataram controversy BJP Congress : ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताला दीडशे वर्षे झाल्यानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये केंद्र सरकारने चर्चा आयोजित करण्यामागे दोन प्रमुख कारणे होती. एक. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक आणि दोन. काँग्रेसला मुस्लिम अनुनयाच्या मुद्द्यावरून कैचीत पकडणे. गुरुवारी राज्यसभेत या विषयावरील चर्चा संपल्यानंतर, आपल्याच जाळ्यात भाजप अडकत गेल्याचे स्पष्ट झाले. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नगण्य म्हणावे लागेल. त्यामुळे तिथल्या निवडणुकीच्या दृष्टीने ‘वंदे मातरम’वर चर्चा केली किंवा नाही, तरी काँग्रेसला फारसा फरक पडत नाही. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला भाजपने डिवचले असे म्हणावे तर तो हेतूही साध्य झाला नाही. दीडशे वर्षांपूर्वी तृणमूल काँग्रेस पक्ष अस्तित्वात नव्हता. तृणमूल काँग्रेसला मुस्लिम मते देत असल्याने ‘वंदे मातरम’च्या चर्चेचा वापर तृणमूल काँग्रेस विरोधात झाला तर चांगलेच हा भाजपचा हिशोब होता. ‘वंदे मातरम’ची चर्चा काँग्रेस विरोधात वापरली जाऊ शकते हे भाजपला माहीत होते. त्यामध्ये पं. नेहरू, इंदिरा गांधी वगैरे गांधी घराण्यावर गरळ ओकता येते, त्यातून वातावरण निर्मिती होते. हे साधे-सोपे राजकीय गणित असते. ते साधण्याचा भाजपचा प्रयत्न होता, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर इतर भाजप नेत्यांच्या भाषणावरून दिसते. पण, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी भाजपवर कडी केली!
‘वंदे मातरम’वरील चर्चेची सुरुवात करताना मोदी म्हणाले की, इथे कोणी सत्ताधारी-विरोधक नाही. ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगीत आहे, त्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. त्यांचे म्हणणे खरे होते. ‘वंदे मातरम’ या गीताचा स्वीकार स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसने केला. त्यानंतर स्वतंत्र भारतात काँग्रेस सरकारने या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला. त्यामुळे काँग्रेसचा ‘वंदे मातरम’ला विरोध असण्याचे काही कारण नव्हते. त्यामुळे काँग्रेसविरोधात मुद्दा फक्त पं. नेहरूंनी या गीताची दोन कडवी स्वीकारली, इतर कडवी टाकून दिली, असा मोदी आणि त्यांच्या नेत्यांचा आरोप होता. ‘वंदे मातरम’च्या चर्चेचा जीवही इतकाच छोटा, नेहरूंपुरता सीमित होता. खरेतर मोदींकडून ‘वंदे मातरम’वर नेहरूंच्या पलिकडे जाऊन मांडणी अपेक्षित होती तसे झाले नाही. उलट, त्यांचे अवसान तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी काढून घेतले.
मोदींच्या भाषणाच्या काही मिनिटांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या शताब्दी रॉय यांनी मोदींच्या बंकिम‘दा’वर आक्षेप घेता होता. पण, मोदींनी त्या काय म्हणत आहेत हे ऐकूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तृणमूलचे ज्येष्ठ खासदार सौगत राय यांनी मोदींना टोकले. ते बोलतात तेव्हा सभागृहाला ऐकून घ्यावे लागते. कधी कधी सौगत राय विनाकारण हस्तक्षेप करतात, त्यावर लोकसभाध्यक्ष वा पीठासीन अधिकारी त्यांना शांत राहण्यास सांगतात. मोदी-शहांनीही त्यांना, ‘दादा तुमची तब्येत बरी आहे ना’, असे विचारले होते. पण, ‘वंदे मातरम’चे जनक ज्येष्ठ साहित्यिक बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचा उल्लेख ‘दा’ असा करणे बंगाली लोकांसाठी अपमान ठरतो, हे सौगतांनी सांगितल्यावर मात्र मोदींना माघार घ्यावी लागली. ‘मोदी, बंकिमचंद्र तुमचे मोठे भाऊ नाहीत, त्यांचा ‘दा’ असा उल्लेख करणे गैर आहे. त्यांना बंकिम‘बाबू’ म्हणा’. ही चूक मोदींनी सुधारली. पण, मोदींचे भाषण सुरू असताना त्यांची चूक दाखवून देण्याचे धाडस सौगत रायच करू शकतात! सौगत राय यांच्या हस्तक्षेपानंतर भाजपच्या नेत्यांनी ही चूक करणे टाळले. राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ‘बंकिमबाबू’ असा उल्लेख करून नामुष्की टाळली.
प्रियंका- खरगे- राजांमुळे पोलखोल
काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी-वाड्रा यांनी भाजप नेत्यांच्या भाषणातील पोलखोल कशी करायची हे पहिल्यांदाच दाखवले. भाजपच्या मांडणीतील चुका आणि खोटेपणा उघड करून दाखवला तरच काँग्रेसला टिकता येईल हा स्वपक्षीयांसाठी प्रियंका यांनी दिलेला संदेशही तितकाच महत्त्वाचा होता. मोदी माहितीचा अचूक आधार घेतात पण, ते लोकांना अपूर्ण माहिती देतात, त्यातून दिशाभूल होते. अशी अर्धीमुर्धी माहिती देऊन दिशाभूल करणे हाच हेतू असतो, हा जाणीवपूर्वक केलेला खेळ हाणून पाडा, असेही प्रियंका यांचे सांगणे होते.
मोदी म्हणाले की, ‘वंदे मातरम’च्या गीतातील पहिली दोन कडवीच पं. नेहरूंनी स्वीकारली, इतर कडवी मुस्लिमांच्या तुष्टीकरणासाठी टाकून दिली. हे मोदींचे विधान अर्धसत्य असल्याचे प्रियंका यांनी दाखवून दिले. या गाण्यासंदर्भात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नेहरूंना पत्र लिहून विचारले होते. रवीद्रनाथ टागोर यांनी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ‘वंदे मातरम’ पहिल्यांदा गायले. वंदे मातरमवर नेहरू व टागोर यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर टागोरांनी, इतर कडवी गाळून टाकली तरी चालतील असे मत व्यक्त केले. म्हणजे फक्त नेहरूंनी इतर कडवी गाळली हा आरोप चुकीचा ठरतो असे प्रियंका यांचे म्हणणे होते. ‘वंदे मातरम’च्या संदर्भात नेताजी, टागोर आणि नेहरू यांची पत्रापत्री वाचली तर वास्तव वेगळेच दिसते.
मोदींचा आरोप होता की, काँग्रेसच्या मुस्लिम अनुनयाची सुरुवात नेहरूंनी ‘वंदे मातरम’ची इतर कडवी गाळून केली. हाही आरोप तितकासा खरा नाही असा प्रतिवाद केला गेला. ‘वंदे मातरम’ची पहिली दोन कडवी बंकिमचंद्र यांनी आधी लिहिली होती, त्यानंतर त्याचा ‘आनंदमठ’ कादंबरीत समावेश केला, हे करताना त्यांनी इतर कडवी लिहिली होती. पहिल्या दोन कडव्यांमध्येच सर्वसमावेशक राष्ट्रभक्तीचे दर्शन घडते, हा युक्तिवाद नेताजी, नेहरू, टागोर या सगळ्यांचाच होता. मुस्लिम अनुनय करण्याचा मुद्दा असेल तर नेताजींनी इतर मुद्द्यांबाबत का आग्रह धरला नाही, असा खरा प्रश्न निर्माण होतो. नेताजी, टागोर यांच्या भूमिकेवरही भाजप शंका घेणार का, असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी केला. राज्यसभेत विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचा मुद्दाही हाच होता.
खरगेंनी भाषणाची सुरुवातच ‘वंदे मातरम’च्या घोषाने केली. बंगालमध्ये जिनांच्या मुस्लिम लीगशी युती करून जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी सरकार बनवले होते. तेव्हा जनसंघाला मुस्लिम लीग कसे चालले, असा हा प्रश्न होता. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने मुफ्ती महम्मद सईद यांच्या ‘पीडीपी’शी युती करून सरकार स्थापन केले होते. त्यावर भाजपला काही बोलता येत नाही. १९३७ मध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या राष्ट्रगीतातील फक्त पहिल्या दोन कडव्यांनाच राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता हे खरे. या बैठकीत उपस्थित असलेल्यांमध्ये पंडित नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, अबुल कलाम आझाद, आचार्य कृपलानी, पंडित मदन मोहन मालवीय, डॉ. राजेंद्र प्रसाद, जी.बी. पंत यांचाही समावेश होता. या बैठकीमध्ये कोणीही आक्षेप का घेतला नाही, याचे उत्तर भाजपच्या एकाही नेत्याने भाषणात दिले नाही. मोदींनी अपूर्ण माहिती दिली, अमित शहांचा आरोप फक्त नेहरूं पुरताच सीमित होता.
नेहरूंनी ‘वंदे मातरम’ची फाळणी केली म्हणून भारताची फाळणी झाली असा शहांचा युक्तिवाद होता. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वंदे मातरमची फक्त दोन कडवी स्वीकारली गेली त्याचा अर्थ इतर कडवी राष्ट्रगीत म्हणून किंवा स्वातंत्र्यलढ्याचा भाग म्हणून स्वीकारू नये यावर कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित नेत्यांची सहमती होती असे म्हणता येऊ शकते. प्रयिंका आणि खरगे यांच्या भाषणातील मतितार्थ हाच होता. त्यांच्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे असे दिसते. ‘द्रमुक’चे लोकसभेतील खासदार ए. राजा यांनी पुराव्यासह ‘वंदे मातरम’च्या इतर कडव्यांची समीक्षा भाषणात केली. ते काय म्हणाले हे सविस्तर जाणून घेता येईल.
आरोपांची चिरफाड
१९०२ मध्ये बंगालमध्ये गुप्त क्रांतिकारी संघटना, अनुशीलन समिती (बिप्लबी) स्थापन करण्यात आली. सशस्त्र संघर्षाद्वारे स्वातंत्र्य मिळवण्याचा ‘बिप्लबीं’चा उद्देश होता. ‘वंदे मातरम’ला राष्ट्रीय गाण्याचा दर्जा देण्यासाठी सर्वात जोरकस मोहीम बिप्लबींनीच केली होती. बिप्लबीमध्ये मुसलमानांना सहभागी होण्याची परवानगी नव्हती. संघटनेतील प्रवेशावेळी घेतले जाणारे व्रत हिंदूंसाठी होते, मुसलमानांसाठी नव्हते. गृह विभागाच्या दस्तऐवजांनुसार १९०५–१९०८ दरम्यान बंगालमध्ये मशिदींमध्ये नमाज सुरू असताना हिंदू मिरवणुकांमध्ये ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या जात असत. १९०७ मध्ये पत्रके वाटली गेली. मुसलमानांनी ‘वंदे मातरम’ म्हणू नये, स्वदेशी चळवळीत सामील होऊ नये, असे पत्रकांमध्ये म्हटले होते. असे दोन प्रमुख मुद्दे द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी मांडले. राजांची दिलेले दाखले पाहिले तर ‘वंदे मातरम’ची इतर कडवी का वगळली गेली आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी हा प्रस्ताव का मान्य केला हे समजू शकते. पं. नेहरूंनी नेताजींना लिहिलेल्या पत्रामध्ये ‘वंदे मातरम’वरून सुरू झालेला वाद प्रमुख्याने सांप्रदायिक लोकांकडून निर्माण केला जात असल्याचे म्हटले होते. त्याचा उल्लेख प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या भाषणात होता. भाजप नेत्यांचा नेहरूंवरील आरोपांची ही मुद्देसूद चिरफाड होती.
‘वंदे मातरम’च्या चर्चेची गरज
प्रियंका गांधी-वाड्रा म्हणाल्या की, वंदे मातरमवर चर्चा करण्याची खरच गरज आहे? या विधानावर अमित शहांनी राज्यसभेत आक्षेप घेतला. ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रभक्तीचे प्रतिक असल्याने ‘वंदे मातरम’ची स्वांतत्र्यपूर्व काळातही गरज होती, आत्ताही आहे आणि पुढेही राहील. ‘वंदे मातरम’वर चर्चा करताना शहांनी हे राष्ट्रगीत भारतीय संस्कृती- पंरपरा, अस्मितेशी कसे जोडले गेले आहे याचा तपशील दिला. त्यांचे म्हणणे होते की, या गीताला इस्लामी आक्रमणाचीही पार्श्वभूमी आहे. हा शहांचा मुद्दा खरेतर भाजपची कोंडी करणारा आहे. संघ-भाजपच्या विचारसरणीत आणि देशबांधणीमध्ये परकीय आक्रमकांना हुसकावून लागवण्याला महत्त्व आहे. त्यामुळेच तर सरसंघचालक गोळवलकरांच्या विचारांनुसार मुस्लिम हे परकीय ठरतात.
परकीय आक्रमकांपासून देशाला वाचवणे व घडवणे ही संघाची उद्दिष्टे आहेत. जर ‘वंदे मातरम’ या गीताला इस्लामी आक्रमणाची पार्श्वभूमी असेल तर हे गीत केवळ हिंदूंपुरते सीमित राहते. आणि हाच मुद्दा ‘द्रमुक’चे खासदार ए. राजा यांनी मांडला होता. त्यांचे म्हणणे होते की, ‘वंदे मातरम’ हे गीत केवळ हिंदूंसाठी लिहिले गेले होते! प्रियंका गांधी-वाड्रा यांनी मूलभूत मुद्दा मांडला होता की, ‘वंदे मातरम’ हे गीत आपल्या सगळ्यांसाठी राष्ट्रगीत म्हणून मान्य आहे, ज्या मुद्द्यावर एकमत आहे, अशा मुद्द्यांवर चर्चा करून फायदा काय? त्यापेक्षा देशातील वास्तव प्रश्नांवर चर्चा केली पाहिजे. खरगेंनी ‘वंदे मातरम’च्या चर्चेत हे वास्तव मुद्दे आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर मात्र भाजपचे नेते संतप्त झाले.
हे मुद्दे आणू नका, फक्त ‘वंदे मातरम’वर चर्चा करा, असे ते म्हणत होते. या सगळ्या चर्चांमध्ये एक छोटे तरीही वेगळे आणि वास्तव प्रश्नांना हात घालणारे अत्यंत चांगले भाषण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी केले. ते म्हणाले की, ‘आनंदमठ’ कादंबरीला बंगालमधील दुष्काळाची पार्श्वभूमी आहे. बंगालमधील तेव्हाच्या दुष्काळाची वर्णने वाचली असतील, कहाण्या ऐकल्या असतील किती विदारक परिस्थिती होती हे लक्षात येईल. तेव्हापासून आपला शेतकरी दुष्काळाला समोरा जात आहे. महाराष्ट्रात यावर्षी ओला दुष्काळ पडला, शेतकऱ्यांची वाताहात झाली, त्याकडे सरकारे लक्ष देणार आहेत की नाही? शेतीव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, शेतकरी रस्त्यावर आला आहे. त्याकडे केंद्र सरकारने पाहिले पाहिजे. शेतकऱ्यांना मदत करा, असा आवाहन भगरे यांनी केले. ‘वंदे मातरम’ची चर्चा कुठे भरकटत गेली हे भगरेंच्या भाषणातून अचूकपणे समजू शकते.
