वाढत्या इंधन दरवाढीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर वारंवार हल्ला केला. आता केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात १० रुपये कपात केल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधलाय. देशात केंद्र सरकारसोबत भाजपशासित राज्यांनी देखील इंधन दरात कपात केली. आता काँग्रेसशासित राज्यांनी देखील इंधन दरकपात करावी. त्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मध्यस्थी करावी, अशी खोचक मागणी भाजपाने केलीय.

भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधींच्या ‘पाकिटमार’ या शेरेबाजीवरून काँग्रेसवर निशाणा साधला. गौरव भाटिया म्हणाले, “आता इंधन कपातीवर असलेल्या मौनावरून हे स्पष्ट होतंय की त्यांचा हेतू जनतेला दिलासा देणं नव्हता तर केवळ राजकारण करण्याचा होता. सोनिया गांधी यांनी या विषयावर राजकारण करू नये. त्यांनी काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी हस्तक्षेप करावा.”

हेही वाचा : इंधन दरवाढीवरून शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले २५ टक्के कर कमी केला तरी…

“दुसरं कुणी नाही तर काँग्रेसच पाकिटमार आहे. महाराष्ट्रात पेट्रोलवर ३१.१९ रुपये आणि राजस्थानमध्ये ३२.१९ रुपये वॅट आहे. भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये २१.८६ रुपये आणि उत्तराखंडमध्ये २०.४६ रुपये वॅट आहे. यावरून कोणाचं सरकार जनतेची लूट करतंय हे स्पष्ट होतं,” असंही गौरव भाटिया यांनी नमूद केलं.

इंधन दरवाढीवरून शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील इंधन दरवाढ आणि महागाईवरून मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. “मनमोहन सिंग यांच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढल्यानं काही दरवाढ करावी लागली, तर आत्ता सत्तेवर असलेल्यांनी तेव्हा १० दिवस संसदेचं काम बंद पाडलं. मात्र, आज जगात या किमती कमी झाल्या तरी दर कमी झाले नाहीत,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं. तसेच केंद्र सध्या जो कर लावतंय त्यातील २५ टक्के कर कमी केला तरी सर्वसामान्यांना महागाईला तोंड देता येईल, असंही नमूद केलं. ते आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले होते, “मनमोहन संगि पंतप्रधान असताना मीही त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढले म्हणून मनमोहन सिंग यांना नाईलाजाने इंधन दरवाढ करावी लागली. आज ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत त्यांनी तेव्हा १० दिवस संसदेत काम करू दिलं नाही. काम बंद पाडलं. तेव्हा जगात किंमत वाढली म्हणून इथं किंमत वाढली हे कारण सांगायला होतं. आता जगात किंमत कमी झाली तरी इथं काही दर कमी झाले नाही. इथं वाढत्याच किमती ठेवल्या.”

“२५ टक्के कर कमी केला तरी या सामान्यांना महागाईला तोंड देता येईल “

“देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितलंय की केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवर जो कर बसवला आहे त्यातील २५ टक्के कर कमी केला तरी या वाढत्या महागाईला सामान्य नागरिकांना तोंड देता येईल. पण हे सरकार त्यावर विचार करायला तयार नाही,” असं शरद पवार यांनी नमूद केलं होतं.