मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ‘इंडिया’ आघाडीने रविवारी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मात्र, या सभेतील उपस्थितीवरून आता भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका केली आहे. “१० लाख लोक येणार असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या सभेत रामलीला मैदानाचा ४० टक्के भाग रिकामाच होता,” असा टोला भाजपाने लगावला आहे.
‘१० लाखांचा दावा, पण हजारो खुर्च्या रिकाम्या’
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. यावेळी त्यांनी सभेचे काही फोटो आणि व्हिडिओ दाखवत मैदानातील रिकाम्या जागांकडे माध्यमांचे लक्ष वेधले.
संबीत पात्रा म्हणाले, “राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने या महारॅलीसाठी तब्बल १० लाख लोक जमणार असल्याचा दावा फुसका बार ठरला आहे. के. सी. वेणुगोपाल आणि पवन खेरा यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही हाच दावा करत होते. मात्र, प्रत्यक्ष वस्तुस्थिती काही वेगळीच होती. दुपारी ३:३० ते ४ वाजेच्या सुमारास मैदानात लावलेल्या २८,००० खुर्च्यांपैकी सुमारे ५,००० ते ७,००० खुर्च्या पूर्णपणे रिकाम्या होत्या. रामलीला मैदानाचा ४० टक्के परिसर रिकामाच राहिला होता. हाच काँग्रेसच्या १० लाख लोकांच्या दाव्याचा खरा चेहरा आहे.”
विरोधकांचे प्रत्युत्तर; ‘सभेत प्रचंड गर्दी, भाजपाच्या पोटात दुखू लागलंय’
दुसरीकडे, विरोधकांनी ही महारॅली अत्यंत यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी भाजपाचे आरोप फेटाळून लावले. “रामलीला मैदानावरील सभा अभूतपूर्व यशस्वी झाली आहे. मैदानातील जनसागर पाहून भाजपाच्या पोटात दुखू लागले आहे. वाढत्या जनक्षोभामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आता राजीनामा द्यावाच लागेल,” असे सिंघवी म्हणाले.
त्याचवेळी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधला. “जनतेचा आक्रोश आता रस्त्यावर दिसू लागला आहे. ज्ञानेश कुमार यांच्यात थोडी जरी नैतिक ताकद शिल्लक असेल, तर जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे हे ओळखून त्यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी थरूर यांनी केली.
‘इंडिया’ आघाडीचे रामलीला मैदानावर मोठे शक्तिप्रदर्शन
मतदार याद्यांच्या पुनरीक्षणात झालेल्या हेरफेरी विरोधात विरोधकांनी ‘मत चोरी’चा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. या सभेला ‘इंडिया’ आघाडीतील अनेक दिग्गज नेते एकाच मंचावर उपस्थित होते.
या महारॅलीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती, तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर सवाल उपस्थित करत विरोधकांनी आगामी काळात हा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, भाजपच्या या नव्या दाव्यामुळे आता या शक्तिप्रदर्शनावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या अधिकच रंगण्याची शक्यता आहे.
