नवी दिल्ली : राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात दबाव वाढवला असून कथित ’अराजक परिस्थिती’ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अजय भल्ला यांना पत्र पाठवले आहे, तर हाच मुद्दा उपस्थित करण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी दिल्लीत भल्ला यांची भेट घेतली.
राज्यातील पोलीस यंत्रणा महाविकास आघाडी सरकारच्या व प्रामुख्याने शिवसेनेच्या दावणीला बांधली गेल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. हनुमान चालिसा प्रकरणात अटक करण्यात आलेले अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे पती-आमदार रवी राणा यांची विचारपूस करायला गेलेले सोमय्या यांच्यावर पोलिसांच्या ‘संरक्षणा’खाली जीवघेणा हल्ला करण्यात आला. राज्यातील पोलीस यंत्रणा महाविकास आघाडी सरकारची नोकर बनली असून पोलिसांनी सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे. सोमय्या यांना केंद्र सरकारने झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली असूनदेखील पोलिसांनी सोमय्यांच्या संरक्षणाकडे गांभीर्याने पाहिले नाही, असा आरोप फडणवीस यांनी पत्रात केला आहे.
तातडीने विशेष केंद्रीय पथक पाठवा!
फडणवीस यांच्या पत्रामध्ये तसेच सोमय्या यांच्या मागणीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा थेट उल्लेख नसला तरी अप्रत्यक्षपणे ही बाब सुचित झाली आहे. सोमय्या यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची २५ मिनिटे चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीने विशेष पथक पाठवून परिस्थितीची पाहणी करावी, अशी आग्रही मागणी केली. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालय पुढील दोन दिवसांमध्ये निर्णय घेईल, अशी माहिती सोमय्या यांनी भल्ला यांच्या भेटीनंतर पत्रकारांना दिली. भल्ला यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सोमय्या यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचीही भेट घेतली.
गुन्हा पुन्हा नोंदवण्याची मागणी
पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर कारवाई करावी तसेच, केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) मुंबई पोलिसांत पुन्हा गुन्ह्याची नोंद करावी, अशी मागणी करणारे पत्र सोमय्या यांनी भल्लांना दिले. सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यांसह अन्य सात प्रकरणांची माहितीही भल्ला यांना देण्यात आली. भल्ला यांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळात आमदार अमित साटम, मिहीर कोटेचा, सुनील राणे, पराग शहा, राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा आदींचा समावेश होता.
राज्य सरकारकडून अहवाल मागवा -लोकसभा सचिवालय
राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालय कोठडी देण्यात आली असून आपल्या अटकेविरोधात व पोलिसांनी दिलेल्या वागणुकीविरोधात खासदार नवनीत राणा यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना सोमवारी पत्र पाठवून तक्रार केली. या तक्रारीची लोकसभेच्या विशेषाधिकार व नैतिकता समितीने तातडीने दखल घेतली. राणांच्या आरोपासंदर्भात राज्य सरकारकडून अहवाल मागवण्याची विनंती या समितीने केंद्रीय गृहमंत्रालयाला केली आहे. आपण अनुसूचित जातीतील असल्याने पोलिसांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.
पांडेंनी फुटेज गायब केले- सोमय्या
‘‘खार पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गुंडांनी माझ्या कारवर हल्ला केला, मलाही मारहाण केली. माझ्यावर हल्ला होऊ शकतो असे मी पोलिसांनी सांगितले होते. पण ठाण्यातून बाहेर येताच पोलिसांनी मला ७०-८० गुंडांच्या हवाली केले. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी गायब केले आहे. माझ्यावरील हल्ल्यासंदर्भातील नोंदवलेल्या गुन्ह्याच्या मजकुरातही फेरफार करण्यात आला आहे,’’ असे अनेक गंभीर आरोप सोमय्या यांनी केले. अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांना हनुमान चालिसा प्रकरणात २३ एप्रिल रोजी अटक केल्यानंतर सोमय्या राणा दाम्पत्याला भेटायला खार पोलीस ठाण्यात गेले होते.