उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार असणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांच्या सभेदरम्यान भाजपा समर्थकांनी गोंधळ घातल्याचा आरोप होत आहे. बोरिवली येथे उर्मिला मातोंडकर प्रचार करत असताना भाजपा समर्थकांनी नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. यामुळे काही काळ त्याठिकाणी तणाव निर्माण झाला हातो. उर्मिला मातोंडकर यांनी भाजपानेच सभेत गुंड घुसवले असा आरोप केला आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं की, ‘व्यवस्थित परवानगी घेऊन सभा घेत होती. अत्यंत शांत मार्गाने सभा सुरु असताना भाजपाचे गुंड लोक आले होते. त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. आमच्या लोकांनी आधी दुर्लक्ष केलं. पण नंतर त्यांनी अश्लील, विभत्स हावभाव करण्यास सुरुवात केली. त्यांनी महिलांमध्ये दहशत पसरवण्याचं प्रयत्न केला’.
#WATCH Scuffle broke out between Congress workers & BJP supporters during Congress candidate from Mumbai North, Urmila Matondkar’s election campaign at Borivali. #Maharashtra. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/0CD5bhD2Ly
— ANI (@ANI) April 15, 2019
त्यांनी जाणुनबुजून महिलांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. पकडण्यासाठी गेले असता सगळ्यांनी पळ काढला असं सांगताना उर्मिला मातोंडकर यांनी पोलीस संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी हे प्रशासन काय करत आहे, आधी असे प्रकार होत नव्हते असा सवाल विचारला. मोदींच्या नावे घोषणाबाजी करणारे सामान्य नागरिक होते असं सांगितलं जात आहे असं विचारलं असता हे सगळे भाड्याचे गुंड आहेत सामान्य लोकांना यासाठी वेळ नसतो असं त्यांनी सांगितलं.