समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधून भाजपचे राजकीय पलायन होईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभा निवडणूक होण्याआधीच पळू लागले आहेत. त्यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, मग, मथुराचे नाव घेतले गेले पण, भाजपने त्यांना आपल्या घरी गोरखपूरमधूनच लढण्याचा आदेश दिला आहे, अशी उपसाहात्मक टिप्पणी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शुक्रवारी मुझफ्फनगरमध्ये केली. ‘माझे हेलिकॉप्टर दिल्लीत जाणूनबुजून थांबवून ठेवल्याने मुझफ्फरनगरला पोहोचायला उशीर झाला’, असा आरोपही अखिलेश यांनी केला.

पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये १० फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून समाजवादी पक्ष व राष्ट्रीय लोक दल यांच्या आघाडीसाठी महत्त्वाच्या मुझफ्फरनगरमध्ये अखिलेश यादव व जयंत चौधरी यांनी पहिल्यांदाच संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भाजपने राष्ट्रीय लोक दलाला दिलेल्या राजकीय ‘निमंत्रणा’वर टिप्पणी करताना अखिलेश म्हणाले की, भाजपने निमंत्रण दिले असेल पण, त्यांच्याकडे लक्ष कोण देत आहे? उत्तर प्रदेशमध्ये भाजपची किती दुरवस्था झाली आहे बघा, अन्य पक्षांना निमंत्रण देऊन पाठिंबा मागण्याची वेळ भाजपवर आली आहे.  सप-आरएलडी   भाजपला धोबीपछाड देईल, असे अखिलेश म्हणाले. 

शेतकरी आंदोलनापासून पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये कृषि कायदे आणि उसाच्या शेतीच्या समस्या हे मुद्दे ऐरणीवर आले असून भाजपच्या कृषि धोरणावर अखिलेश यादव यांनी तीव्र टीका केली. शेतकऱ्यांच्या दबावामुळे मोदी सरकारला कृषि कायदे मागे घ्यावे लागले, त्याबद्दल शेतकऱ्यांचे कौतुक केले पाहिजे. भाजपने कृषि कायदे रद्द केले खरे पण, हे कायदे केले कशासाठी आणि मागे तरी कशासाठी घेतले? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे भाजपच्या एकाही नेत्याला देता आलेली नाहीत, अशा शब्दांत अखिलेश यादव यांनी भाजपवर टिकेची झोड उठवली.

उसकरी शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले जातील, त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी आश्वासने भाजपने दिली पण, त्यांनी दाखवलेली स्वप्ने वास्तवात उतरली नाहीत. राज्यात सप-आरएलडीची सत्ता आली तर, अर्थसंकल्पात तरतूद करून शेतकऱ्यांना पैसे दिले जातील. ३०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, अशी आश्वासने अखिलेश यांनी पश्चिम उत्तर प्रदेशातील मतदारांना दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp escape from uttar pradesh samajwadi party chief akhilesh yadav akp
First published on: 29-01-2022 at 00:12 IST