माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी खासदार बाबुल सुप्रियो यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर सुप्रियो यांनी भाजपा सोडल्याचे जाहीर केले होते. तसेच त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणाही केली होती. त्यानंतर तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, भाजपा सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि भाजपा नेते स्वपन दासगुप्ता यांच्यात ट्विटरवर शाब्दिक चकमक पहायला मिळाली.

बाबुल सुप्रियोच्या पक्षांतरामुळे त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेला नुकसान पोहोचू शकते, असा दावा स्वपन दासगुप्तानी केला होता. या दाव्याला उत्तर देताना सुप्रियो म्हणाले, की भाजपामध्ये सामील झाल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला ज्यांना महत्वाची पदं देण्यात आली होती, त्या प्रतिस्पर्ध्यांबाबतही हेच खरं असावं. तसेच मी पक्ष बदलून इतिहास रचला आहे का? असं असेल तर भाजपमध्ये सुद्धा दुसऱ्या पक्षातून नव्यानं सामील झालेल्या ‘एकेकाळच्या प्रतिस्पर्ध्यां’च्या गळ्या भेटी घेतल्या गेल्या आहेत आणि त्यांना उच्च पदांवर बसवले गेले आहे. हे सर्व करताना जे भाजपचे तळागाळातील खरेखुरे लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. जर तुमचं म्हणणं आहे मी पक्ष बदलून माझी स्वत:ची प्रतिमा खराब करून घेतली आहे तर मग भाजपमध्ये आलेल्या लोकांची देखील प्रतिमा खराबच झाली असेल नाही का?’ असे ट्विट बाबुल सुप्रियो यांनी केले आहे.

राज्यसभेचे खासदार स्वपन दासगुप्ता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, बाबुल सुप्रियो यांना टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर भाजप समर्थकांचा राग येणं आणि सामान्य लोकांचा तिरस्का वाटणं खूपच स्वाभाविक आहे. याला उत्तर देताना बाबुल सुप्रियो म्हणाले, “हे मला मान्य असून माझा राग खरा आहे. तसेच याच बाबुलने बाहेरच्यांना भाजपमध्ये घेण्याचा जाहीरपणे निषेध केला होता त्याचे काय? त्यावेळी काय भाजपने बाबुलची प्रतिमा चांगली केली होती का? याच समर्थकांना विचारा ज्यांना या बाहेरून आलेल्या लोकांनी बाजूला केले होते,” असंही बाबुल सुप्रिया म्हणाले.

शनिवारी स्वपन दासगुप्ता यांनी ट्वीट केले होते की, “बाबुल सुप्रियो यांनी भाजप सोडल्याचं त्यांना दुःख आहे. ते आमच्या पक्षाची संपत्ती होते.”