डाव्यांचा गड असलेल्या त्रिपुरात भाजपाला घवघवीत यश मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावलेले राम माधव यांच्याकडे आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीची सूत्रे देण्यात आली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरचिटणीस असलेले राम माधव यांना पक्षाला कर्नाटकमध्ये विजय मिळवून देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राम माधव आता राज्यातील निवडणूक यंत्रणेवर लक्ष ठेवणार आहेत. राम माधव यांनी गुरूवारी बेंगुळुरू येथे संघातील पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चाही केली असल्याचे सांगण्यात येते.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघातून भाजपात आलेले राम माधव यांच्याकडे सध्या ईशान्य भारत आणि जम्मू-काश्मीरचे प्रभारीपद आहे. यावरून त्यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज येतो. दक्षिण भारतात पाय रोवण्यासाठी भाजपाला कर्नाटकात विजय मिळवणे अत्यंत महत्वाचे आहे. कर्नाटकात यंदा भाजपा आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे मानले जाते.

कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात सत्ता मिळवायची असा चंगच पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी बांधला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेही भाजपाला जशास तसे उत्तर देण्याच्या पावित्र्यात आहेत. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यास मान्यता देऊन सिद्धरामय्या यांनी मास्टरस्ट्रोक मारल्याचे बोलले जात आहे. तर भाजपाने काँग्रेसचा हा हिंदू धर्मात फूट पाडण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसते.

कोण आहेत राम माधव

ईशान्य भारतात भाजपाचे पाय रोवणारे राम माधव हे मुळचे आंध्र प्रदेशमधील अमलापूरम येथील आहेत. त्यांचा जन्म २२ ऑगस्ट १९६४ मध्ये झाला होता. त्यांनी आंध्र प्रदेशमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केलेला आहे. कर्नाटकमधील म्हैसूर विद्यापीठातून त्यांनी पॉलिटिकल सायन्समधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. ५३ वर्षीय राम माधव हे भाजपामध्ये येण्यापूर्वी रा.स्व. संघाशी निगडीत होते. वर्ष २००३ मध्ये त्यांनी मा. गो. वैद्य यांच्या जागी संघाचे प्रवक्ते म्हणून नेमण्यात आले. वर्ष २०१४ मध्ये भाजपाने त्यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्त केले.