चेन्नई : तमिळनाडू भाजपचे सरचिटणीस के. टी. राघवन यांच्यावर एका यूटय़ूब व्हिडीओमध्ये लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करण्यात आल्यानंतर मंगळवारी त्यांनी राजीनामा दिला. भाजपच्या एका कार्यकर्त्यांने जारी केलेल्या या व्हिडीओत राघवन हे पक्षाच्या एका महिला कार्यकर्तीशी  अश्लाघ्य व्हिडीओ कॉल करत असल्याचे दाखवले आहे.

भाजपच्या या नेत्याचे अशाच प्रकारचे आणखी किमान १५ व्हिडीओ असल्याचा दावा मंगळवारी सकाळी हा व्हिडीओ जारी करणाऱ्या मदन रविचंद्रन याने केला. पक्षाचे प्रदेशाध्यश्र के. अण्णामलाई यांच्या संमतीनेच हा व्हिडीओ आपण जारी केल्याचा दावाही त्याने केला.

आपण कुठलेही फायदे न घेता तीन दशके पक्षासाठी काम केले असल्याचे सांगत राघवन यांनी तात्काळ राजीनाम्याची घोषणा केली. आपल्याला तसेच भाजपला बदनाम करण्यासाठी हा व्हिडीओ जारी करण्यात आल्याचेही ते म्हणाले. आपण या आरोपांचे खंडन करत असून, कायदेशीररीत्या तोंड देऊ असेही त्यांनी सांगितले.

या व्हिडीओचा खरेपणा पडताळून पाहण्यासाठी अंतर्गत चौकशीचा आदेश देण्यात आल्याचे अण्णामलाई यांनी सांगितले. व्हिडीओ तुमच्या संमतीनेच जारी करण्यात आल्याच्या रविचंद्रन याच्या दाव्याबाबत विचारले असता, ‘मी त्याला व्हिडीओ सादर करण्यास सांगितले, तसेच या व्हिडीओची पडताळणी केल्याशिवाय आणि आरोप असलेल्या व्यक्तीचे स्पष्टीकरण मिळवल्याशिवाय कारवाई केली जाऊ शकत नाही, असेही सांगितले,’ असे उत्तर अण्णामलाई यांनी दिले.