आपले सरकार कसे लोकाभिमुख आणि देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले निर्णय घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी मंत्री सांगत असले तरी त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते आणि वरिष्ठ पत्रकार अरूण शौरी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकारचा कारभार पाहून लोकांना आता मनमोहन सिंग यांच्या सरकारचीच आठवण येऊ लागल्याची टीका शौरी यांनी केली. त्याचवेळी आतापर्यंत इतके कमकुवत पंतप्रधान कार्यालय आपण कधी पाहिले नव्हते, अशीही टीका त्यांनी मोदींवर केली.
दिल्लीमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर शौरी यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर कोरडे ओढले. ते म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन म्हणजे केवळ माध्यमांमधील अर्थव्यवस्थेसंबंधीच्या शीर्षकांचे व्यवस्थापन असे या सरकारला वाटते आहे. मात्र, त्यातून काहीही साध्य होणार नाही. जुन्या सरकारच्या आणि सध्याच्या सरकारच्या धोरणांमध्ये विशेष काहीच फरक नसल्याची जाणीव लोकांना होऊ लागली आहे. यूपीए सरकारची धोरणे आणि गोमांस यावरच सरकारचे कामकाज सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कर व्यवस्थापनाच्या धोरणांमध्ये आमुलाग्र बदल करण्यात आलेले नाहीत. बॅंकिंग क्षेत्रातील सुधारणाही गेल्या दीड वर्षांपासून विनाकारण प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे झोपलेल्या कासवासारखीच सरकारची अवस्था झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जे उद्योगपती पंतप्रधानांना भेटतात. ते त्यांना मनमोकळेपणाने सर्व गोष्टी सांगत नाहीत. पंतप्रधानांना भेटल्यावर केवळ ते त्यांना काहीतरी करण्याची विनंती करतात. माध्यमांना भेटल्यावर मात्र ते सरकारला दहा पैकी नऊ गुण दिल्याचे सांगतात. या सर्व पार्श्वभूमीवर संसदही कोणतीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावत नसल्याचे शौरी म्हणाले.