वृत्तसंस्था, आगरतळा, नवी दिल्ली : हिंडेनबर्ग-अदानी प्रकरणी भाजपकडे लपवण्यासारखे काहीच नाही असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत केला आहे. सर्वोच्च न्यायलयाने याची दखल घेतली असल्यामुळे आपण त्यावर मतप्रदर्शन करणे योग्य नाही असे म्हणून याप्रकरणी त्यांनी आणखी काही मत व्यक्त केले नाही. शहा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली असून याप्रकरणी लपवण्यासारखे काही नसेल तर केंद्र सरकार संसदेची संयुक्त समितीमार्फत (जेपीसी) चौकशीपासून पळ का काढत आहे हा प्रश्न काँग्रेसने विचारला आहे.
सरकारकडे दडवण्यासारखे काही नसेल तर सरकारने तपासाला परवानगी दिली पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी केली. आम्हाला संसदेत जेपीसी चौकशीची मागणीदेखील उपस्थित करू दिली नाही अशी टीका त्यांनी केली. आपण रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि सेबी यांना पत्र लिहून अदानी समूहाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.