भाजपाने जय श्रीरामाचा नारा देऊन सीतेचं नावही रामापासून वेगळं केलं असा गंभीर आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. भाजपाने कधीही जय सिया राम हा नारा दिलेला नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे
नेमकं काय म्हटलं आहे अशोक गहलोत यांनी?
राहुल गांधी यांनी विचारलेला प्रश्न हा योग्यच आहे. भाजपाचे आणि संघाचे लोक जय श्रीराम हा नारा का देतात? ते जय सीया राम हा नारा का देत नाहीत? आपला संपूर्ण देश हा सीता मातेचा सन्मान करणारा देश आहे. मात्र भाजपाच्या लोकांनी जय श्रीराम हा नारा देऊन लोकांना भडकवण्याचं काम कायमच केलं आहे. या नाऱ्यातून ते भय आणि द्वेष निर्माण करतात. भाजपाने आणि संघाने कायमच द्वेष आणि तिरस्कार पसरवण्याचं काम केलं आहे. मात्र राहुल गांधी हे नेहमी द्वेष मागे सोडून द्या आणि प्रेम, आपुलकी यांचा प्रसार करा हे सांगत असतात असंही अशोक गहलोत यांनी म्हटलं आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी रविवारी जयपूरमधल्या अमर जवान ज्योती या ठिकाणी अँब्युलन्स सेवेला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना भाजपावर टीका केली. भाजपाने सीता मातेला प्रभू रामापासून वेगळं करण्याचं काम केलं आहे. सगळा देश अत्यंत आदराने जय सीया राम असं म्हणत असतो. अशात भाजपाने तिरस्काराचा खेळ करत जय श्रीराम हा नारा दिला आहे.
भाजपचा तिरस्कार पसरवण्याचा खेळ आता यशस्वी होणार नाही
भाजपाने जो तिरस्कार पसरवण्याचा खेळ सुरू केला आहे तो फार काळ चालणार नाही. जनताच त्यांना उत्तर देईल. त्यांना (भाजपा) प्रभू रामचंद्रांवर विश्वास नाही. त्यामुळेच ते हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये भेदाभेद पसरवत आहेत.
भाजपने देशात असं काही वातावरण तयार केलं आहे की फक्त संघ आणि भाजपाचेच लोक हिंदू आहेत. इतर लोक हिंदू नाहीत का? सीता मातेचा सन्मान करणं यांना ठाऊक नाही. महात्मा गांधींच्या सिद्धांतांवर राहुल गांधी चालत आहेत त्यांना हे सगळे नावं ठेवत आहेत. भाजपाने सीता आणि राम यांनाही वेगळं केलं. कारण त्यांचा जय श्रीराम हा नारा तिरस्कार पसरवणारा आहे असंही गहलोत यांनी म्हटलं आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अमर जवान ज्योती या ठिकाणाहून १६७ नव्या अँब्युलन्सना हिरवा झेंडा दाखवला. या सगळ्या रूग्णवाहिका विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवेला बळ देण्यासाठी पुरवल्या जाणार आहेत. या अँब्युलन्स सेवेचं एक मोबाइल अॅप सुरू करण्यात आलं आहे त्याचाही शुभारंभ अशोक गहलोत यांनी केला. यावेळी अशोक गहलोत म्हणाले की देशातल्या फक्त ४१ टक्के जनतेकडे आरोग्य वीमा आहे. राजस्थान मात्र याबाबतीत आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये ९० टक्के लोकांना आपण मुख्यमंत्री चिरंजिवी आरोग्य विमाचा लाभ दिला आहे.