आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातच्या वडोदरामध्ये दाखल झाले आहेत. आम आदमी पक्ष बुक करु इच्छित असलेल्या १३ सभागृहांच्या मालकांना भाजपाने धमकावल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. पक्षाच्या कार्यक्रमासाठी या सभागृह मालकांसोबत आपचे कार्यकर्ते संपर्कात होते. ही भाजपाची गुंडागर्दी असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

‘आप’ म्हणजे ‘अरविंद अ‍ॅडव्हर्टाईझमेंट पार्टी’ ; काँग्रेसची टीका

“त्यांनी १३ सभागृह मालकांना धमकावले आहे. आम्ही कार्यक्रमासाठी जागा निवडताच ही जागा आपच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध नाही, असे सांगण्यात येत होते. यामुळे आम्हाला १३ वेळा जागा बदलावी लागली”, असे माध्यमांशी बोलताना केजरीवाल यांनी सांगितले आहे. “ही कृती योग्य नाही. आम्ही शत्रू नाही तर प्रतिस्पर्धी आहोत. तुम्ही तुमचे राजकारण करा, मला माझे करू द्या. भाजपाच्या या गुंडागर्दीला गुजरातमधील जनता त्रस्त झाली आहे”, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे. दरम्यान, केजरीवाल मंगळवारी दुपारी वडोदरा विमानतळावर दाखल होताच आध्यात्मिक गटाच्या काही स्वयंसेवकांनी “मोदी- मोदी” च्या घोषणांनी त्यांचे स्वागत केले.

‘आत्ममग्न केजरीवाल यांचे जुनेच नाटक’; भाजपचे प्रत्युत्तर

आम आदमी पक्ष सत्तेत आल्यास गुजरातमध्ये दारुबंदी कायम ठेवली जाईल, असे केजरीवाल म्हणाले आहेत. भाजपा गुजरातमध्ये अवैध दारु विक्रीचा १३०० कोटींचा व्यवसाय चालवत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. अवैध पैश्यांवर ‘आप’ चालत नाही. आमच्याकडे पारदर्शक खाते असून प्रामाणिकपद्धतीने पैसा पक्षात येतो, असे केजरीवाल म्हणाले आहेत.

वडोदरा दौऱ्यादरम्यान केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे कौतुक केले आहे. भगवंत मान जर तीन महिन्यांमध्ये मोफत वीज पुरवठा देऊ शकतात, तर इतर पक्षांनी आजपर्यंत वीज मोफत का दिली नाही? पंजाबच्या नागरिकांचा पैसा कुठे आहे? आधीच्या पक्षांनी हा पैसा कुठे दडवून ठेवला आहे? असे सवाल माध्यमांशी बोलताना केजरीवाल यांनी उपस्थित केले.