जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानशी चर्चा करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. दुसरीकडे, मुफ्तींच्या या वक्तव्यावरून शिवसेना केंद्रातीली सत्ताधारी भाजपावर निशाणा साधत आहे. मेहबुबा मुफ्ती आज जे काही बोलत आहेत त्याला भाजपाच जबाबदार असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत. अफजल गुरू आणि बुरहान वानी या दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्यानंतरही भाजपाने पीडीपीसोबत जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते. असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे.
“मेहबूबा मुफ्ती आणि भाजपाची चांगली मैत्री आहे. अफझल गुरू आणि बुरहान वानी यांना पाठिंबा देऊनही, भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये त्यांच्यासोबत सरकार बनवले होते. आज मुफ्ती जे काही बोलत आहेत त्याला भाजपा जबाबदार आहे. आमच्या पक्षाचा विरोध कायम असणार आहे.” अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानशी चर्चा करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. तसेच, जोपर्यंत सरकार पाकिस्तानशी चर्चा करत नाही तोपर्यंत जम्मू-काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदणार नाही, असंही मेहबूबा मुफ्ती यांनी बोलून दाखवलं आहे.