बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांनी भाजपासोबतची युती तोडली

बिहार सरकारमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि जनता दल (संयुक्त) यांच्यातील युती संपुष्टात आली आहे.

बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांनी भाजपासोबतची युती तोडली
संग्रहित फोटो

बिहार सरकारमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि जनता दल (संयुक्त) यांच्यातील युती संपुष्टात आली आहे. याबाबतची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली. मागील काही दिवसांपासून युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तीव्र राजकीय अटकळींनंतर अखेर युती तोडल्याची घोषणा नितीश कुमार यांनी केली आहे. नितीश कुमार यांनी आज आपल्या पक्षातील सर्व खासदार आणि आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर ही घोषणाा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आज दुपारी ४ वाजता राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती समजत आहे.

भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडण्यापूर्वी नितीश कुमार यांनी आपल्या सर्व आमदारांसोबत एक बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीपूर्वीच एका वरिष्ठ नेत्याने “स्फोटक बातमीसाठी सज्ज राहा” असे संकेत दिले होते. खरंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जनता दल (संयुक्त) मध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या कुजबुजीनंतर नितीश कुमार आणि केंद्र सरकारमध्ये तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नुकत्याच पार पडलेल्या नीति आयोगाच्या बैठकीला अनुपस्थित होते. मागील एक महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला नितीश कुमार दुसऱ्यांदा गैरहजर राहिले होते. त्यामुळे नितीश कुमार आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे कोणत्याही क्षणी बिहारमधील सत्ताधारी भाजपा – जदयूमधील युती तुटेल, याबाबत तर्क वितर्क लावले जात होते. अखेर नितीश कुमार यांनी भाजपासोबतची युती तोडल्याची घोषणा केली आहे.

दुसरीकडे, विरोधी पक्ष असलेल्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलानेही आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडल्यास त्यांच्याशी आघाडीची तयारीही राष्ट्रीय जनता दलाने दर्शवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत बिहारमध्ये नवी राजकीय समीकरणे जुळून येण्याची दाट शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘तीन दिवसात बॉम्बने उडवून देऊ’; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी