जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १८ सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपाने आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते जम्मू काश्मीर विधानसभेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी कलम ३७० बाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या विकासासाठी जनतेने भाजपाला मतदान करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
नेमकं काय म्हणाले अमित शाह?
“गेली १० वर्ष जम्मू काश्मीरच्या इतिहासातील सुवर्ण काळ राहिला आहे. यादरम्यान राज्यात शांतात प्रस्तापित करण्यात मोदी सरकारला यश आलं आहे. तसेच राज्यातील दहशतवादही कमी झाला आहे. आम्हाला जम्मू काश्मीरसाठी आणखी बरचं काम करायचं आहे. पुढच्या पाच वर्षात जम्मू काश्मीरचा विकास करायचा आहे. त्यामुळे मी राज्यातील जनतेला आवाहन करतो, की त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जास्तीत जास्त उमेदवारांना विजयी करावं”, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली.
कलम ३७० बाबत म्हणाले…
पुढे बोलताना त्यांनी कलम ३७० बाबतही भाष्य केलं आहे. “मला नॅशनल कॉन्फ्रन्सच्या अजेंड्याबाबत कल्पना आहे. त्यांना राज्यात पुन्हा कलम ३७० लागू करायचं आहे. मात्र, आता ते शक्य नाही. कलम ३७० इतिहासात जमा झालं आहे. हा अनुच्छेद आता संविधानाचा भाग नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे कलम पुन्हा लागू करणे शक्य नाही, असं अमित शाह म्हणाले. तसेच ३७० मुळे जम्मू काश्मीरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून यामुळे राज्यातील तरुणांच्या हातात दगड आणि बंदूके आली आहेत”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात पार पडणार मतदान
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा असून राज्यात तीन टप्प्यात मतदान होणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्याचं मतदान १८ सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्याचं मतदान २५ सप्टेंबर रोजी तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तसेच ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये एकूण ८७.०९ लाख मतदार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा इतक्या कमी टप्प्यात मतदान होत आहे.