मध्यप्रदेशामधील सतना जिल्ह्यातील एका गोदामात तरूणीला मारहाण केल्याच्या आणि धमकी दिल्याच्या आरोपानंतर भाजपाचे नागोद मंडळ अध्यक्ष पुलकित टंडन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. इतकेच नाही तर, या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने देखील टंडन यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे.

पोलिसांनी स्पष्ट केले की तपासाच्या आधारावर आणि व्हायरल व्हिडीओसह इतर पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर योग्य ती पुढील कारवाई केली जाईल.

“या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, आणि आम्ही व्हिडीओ पुराव्याची तपासणी करत आहोत. अद्याप आमच्याकडून टंडन याची चौकशी करणे बाकी आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात आणि त्यांच्यातील वादाचा तपास केला जात आहे,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. टंडन यांनी अद्याप आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री १० च्या सुमारास नागोद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली. तक्रारीमध्ये आरोप करण्यात आला आहे की, पीडितेला एका कस्टमरशी बोलण्याच्या बहाण्याने वेअरहाऊसमध्ये बोलावण्यात आले. महिलेने सांगितले की तिला टंडन यांच्या एका सहकाऱ्याच्या मोबाईलवरून फोन करण्यात आला होता.

तरुणीने दावा केला की जेव्हा तिला वेअरहाऊसमध्ये नेण्यात आले, तिला टंडन हे दारू पित असल्याचे दिसून आले आणि जेव्हा तिने तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तिचा हात पकडला. पुढे या तरुणीने असाही दावा केला की पळून जाण्याच्या प्रयत्ना तिने टंडन यांचा मोबाईल फोन घेतला आणि फेकून दिला आणि ती बाहेर पळाली, यानंतर टंडन यांनी तिच्या दिशेने दारूची बाटली भिरकावली आणि तिचा पाठलाग केला.

महिलेने आरोप केला की टंडनने तिला कानशिलात लगावली, तिला ढकलून दिले आणि तिला लोखंडाच्या रॉडवरती पाडले. पुढे या तरूणीने सांगितले की जेव्हा ती बराच वेळ घरी परतली नाही तिची आई आणि भाऊ घटनास्थळी पोहचले. तिने आरोप केला की जेव्हा त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि घटनेचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला टंडन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांनाही मारहाण केली.

त्यानंतर ही महिला तिची आई आणि भाऊ यांच्याबरोबर नागोद पोलीस ठाण्यात पोहोचली आणि या प्रकरणात तक्रार दाखल केली. .

दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या प्रकरणाकडे भाजपा नेत्यांचे लक्ष वेधले गेले. भाजपा जिल्हा जनरल सेक्रेटरी रमाकांत गौतम यांनी पुलकित टंडन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून या घटनेशी असलेल्या त्यांच्या संबंधाबद्दल स्पष्टिकरण मागितले आहे.