Businessman Gopal Khemka Shot Dead: बिहारची राजधानी पाटणामधील प्रसिद्ध व्यावसायिक आणि भाजपाशी संलग्न असलेल्या गोपाल खेमका यांची त्यांच्या निवासस्थानाबाहेर शुक्रवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, सहा वर्षांपूर्वी वैशाली जिल्ह्यातस त्यांचा मुलगा गुंजन खेमका यांचीही अशाच प्रकारे हत्या झाली होती.
शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गोपाल खेमका घरी परतत असताना हॉटेल पनाशेजवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांचे निवासस्थान या हॉटेलच्या शेजारी असलेल्या सोसायटीत आहे.
पाटण्याचे पोलीस अधीक्षक दीक्षा यांनी या घटनेची माहिती दिली. त्या म्हणाल्या, शुक्रवारी रात्री ११ वाजता खेमका यांच्यावर गांधी मैदानाच्या शेजारी गोळीबार झाल्याची माहिती मला मिळाली. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून गोळीबार केला. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
गोळीबार झालेल्या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. याठिकाणाहून एक गोळी आणि काडतूस आढळले आहे. तसेच सोसायटीच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहे. हल्लेखोर दुचाकीवरून आले असल्याचा संशय आहे, असेही पोलीस अधीक्षक दीक्षा म्हणाल्या.
डिसेंबर २०१८ मध्ये गोपाल खेमका यांचे सुपुत्र गुंजन खेमका यांची हाजीपूर औद्योगिक केंद्रात असलेल्या त्यांच्या कारखान्याच्या गेटबाहेर हत्या झाली होती. सहा वर्षात आता वडिलांचीही अशाच प्रकारे हत्या झाल्यामुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी ज्याठिकाणी गोळीबार झाला त्या स्थळाला भेट देऊन पाहणी केली. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर त्यांनी टीका केली. “बिहार हे गुन्हेगारांचे अभयारण्य बनले आहे. नितीशजी, कृपया बिहारला वाचवा”, अशी पोस्ट त्यांनी एक्सवर शेअर केली आहे.