Anil Vij : हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, काँग्रेससह इतर स्थानिक पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. उमेदवारांच्या याद्याही जाहीर झाल्या आहेत. प्रचारालाही सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात येत असल्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, हरियाणात भारतीय जनता पक्ष नायब सिंग सैनी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. मात्र, असं असतानाच राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल विज यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

अनिल विज म्हटलं की, “मी हरियाणातील भारतीय जनता पक्षाचा सर्वात ज्येष्ठ आमदार आहे. तब्बल सहा वेळा मी निवडणूक लढवली आणि जिंकलो. आता मी सातव्यांदा निवडणूक लढवत आहे. आजपर्यंत मी माझ्या पक्षाकडे कधीच काही मागितलं नाही. पण यावेळी संपूर्ण हरियाणा राज्यातील जनतेच्या विनंतीवरून अनेक लोक मला भेटायला येत आहेत आणि अंबाला कँटमधील जनतेच्या विनंतीवरून यावेळी माझ्या ज्येष्ठते नुसार मी मुख्यमंत्रिपदावर दावा करणार आहे. जर सत्ता आली तर मग मला मुख्यमंत्री करायचं की नाही करायचं हे काम पक्षातील हायकमांडचं आहे. मला जर मुख्यमंत्री केलं तर मी हरियाणाचं चित्र बदलेन”, असं अनिल विज यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “…म्हणून केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी दोन दिवस मागितले”, भाजपाचा मोठा आरोप

दरम्यान, अनिल विज यांनी आज अंबाला कॅन्टोन्मेंट या ठिकाणी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे मोठं विधान केलं. यावेळी त्यांनी मनोहर लाल खट्टर यांच्या कार्यकाळात आम्ही सुरु केलेल्या अनेक कामांची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, माझ्याकडे हरियाणाच्या विविध परिसरातून लोक येतात आणि म्हणतात की, मी सर्वात ज्येष्ठ नेता आहे. मात्र, तरीही कधीही मुख्यमंत्री का झालो नाही? हरियाणातील जनतेने मांडलेल्या मागण्यांच्या आधारे आणि पक्षातील माझी ज्येष्ठता लक्षात घेऊन मी आता मुख्यमंत्रिपदासाठी दावा सांगणार आहे”, असं अनिल विज म्हणाले.

दरम्यान, अनिल विज यांनी मुख्यमंत्रिपदासाठी सांगितलेल्या दाव्यानंतर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्यांनी आपल्या भूमिकेबाबत पुन्हा एकदा भाष्य केलं. अनिल विज म्हणाले, “का नाही? मी सर्वात ज्येष्ठ नेता आहे. माझ्या अनुभवाच्या आधारे आणि संपूर्ण हरियाणातील लोकांच्या इच्छा आणि मागण्यांच्या आधारे मी आज मुख्यमंत्रिपदासाठी दावा सांगत आहे.”

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आधी सत्ताविरोधी लाटेवर मात करण्यासाठी भाजपाने मार्चमध्ये मनोहर लाल खट्टर यांच्या जागी राज्याच्या नेतृत्वासाठी ओबीसी चेहरा देत नायब सिंग सैनी यांच्याकडे जबाबदारी दिली. मात्र, असे बदल केल्यानंतरही सत्ताधारी पक्षाने २०१९ मध्ये जिंकलेल्या १० पैकी पाच जागा गमावल्या. भाजपाने काँग्रेसला गमावलेल्या जागांमध्ये अंबाला लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यामध्ये अनिल विज यांच्या अंबाला कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचाही समावेश आहे. ज्यावेळी मनोहर लाल खट्टर यांच्या जागी नायब सिंग सैनी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी फायनल केलं गेलं होतं, तेव्हा अनिल वीज यांनी नाराजी व्यक्ती केली होती. त्यानंतर ते पक्षाच्या एका बैठकीमधून निघूनही गेले होते. दरम्यान, आता अनिल विज यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत केलेल्या विधानावर भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व काय प्रतिक्रिया देतात? त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.