महिला सुरक्षेवरुन योगी सरकारला घरचा आहेर; भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा स्त्रीयांना म्हणाल्या, “पाच वाजल्यानंतर…”

वाराणसीमध्ये आयोजित वाल्मिकी मोहोत्सवच्या कार्यक्रमादरम्यान महिलांना संबोधित करताना बेबी राणी मौर्य यांनी केलं वक्तव्य

UP Police
उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेवर उपस्थित केला प्रश्न (प्रातिनिधिक फोटो)

भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा बेबी राणी मौर्य यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या त्यांच्याच पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारमधील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चिंता व्यक्त केलीय. महिलांसंदर्भात भाष्य करताना बेबी राणी मौर्य यांनी पोलीस स्थानकांमधील सुरक्षेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वाराणसीमध्ये आयोजित वाल्मिकी महोत्सवच्या कार्यक्रमादरम्यान महिलांना संबोधित करताना बेबी राणी मौर्य यांनी हे वक्तव्य केलंय.

“पोलीस स्थानकामध्ये एक महिला अधिकारी आणि उप निरिक्षक नक्कीच असतात. मात्र एक गोष्ट मी नक्की सांगू इच्छिते की संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अंधार झाल्यावर पोलीस स्थानकात कधीच जाऊ नका. अगदीच गरज असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या भावासोबत किंवा पतीसोबत किंवा वडिलांसोबत पोलीस स्थानकात जा,” असं बेबी राणी मौर्य यांनी म्हटलं आहे.

“अधिकारी सर्वांनाच गोंधळात टाकतात. मला परवा आग्रा येथून एका शेतकऱ्याचा फोन आलेला. त्याला खतं उपलब्ध करुन दिलं जात नव्हतं. माझ्या सांगण्यावर अधिकाऱ्याने शेतकऱ्याला खत देऊ असं सांगितलं. मात्र आज त्या अधिकाऱ्याने पुन्हा खत देण्यास नकार दिलाय. अशाप्रकारचा गोंधळ खालच्या स्तरावरील अधिकारी करतात. या गोष्टी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. कोणताही अधिकारी असं वागत असेल तर त्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे करा. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करा,” असं मौर्य म्हणाल्या.

या वेळेस बोलताना मौर्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करताना त्यांनी महिलांसाठी सुरु केलेल्या योजनांची माहिती दिली. बनारसमधील विकास कामांबद्दलही त्यांनी भाष्य केलं. तसेच महिलांना लवकर न्याय मिळावा म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट सुरु करण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. मात्र दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेसाठी ज्या पोलीस स्थानकांना युपी सरकारने मिशन शक्तीअंतर्गत सुरक्षित करण्यात आल्याचा वादा केलाय त्यावरच मौर्य यांनी शंका उपस्थित केली. बेबी राणी मौर्य यांच्या या वक्तव्याची वाराणसीमध्ये चांगलीच चर्चा असून त्याचं भाषण सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp leader baby rani maurya ask women not to go police station after 5 pm scsg

ताज्या बातम्या