मध्य प्रदेशच्या विदिशा शहरातील भाजपा नेते आणि माजी नगरसेवक संजीव मिश्रा यांनी नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले. आपल्या दोन मुलांच्या असाध्य आजाराला कंटाळून त्यांनी गुरुवारी संध्याकाळी आपली पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली. भाजपा नेत्याच्या दोन्ही मुलांना ड्यूशेन मस्कुलर डिस्ट्राफी (डीएमडी) नावाचा असाध्य आजार झाला होता. या आजाराच्या उपचारांनी मिश्रा त्रस्त झाले होते. आत्महत्या करण्याची आधी त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. तसेच सुसाईड नोट लिहून आत्महत्येचे कारणही सांगितले.
भाजपाचे विदिशा शहराचे मंडळ अध्यक्ष सुरेंद्र सिंह चौहान यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बंटी नंगर परिसरात राहणाऱ्या संजीव मिश्रा यांनी माजी नगरसवेक पदही त्यांनी भूषविले होते. आता ते भाजपाच्या मंडळ उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होते. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी सहा वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियावर ओक पोस्ट लिहिली होती. ज्यात ते म्हणाले, देवाने शत्रुच्या मुलांना देखील असा आजार देऊ नये.” ही पोस्ट वाचून मिश्रा यांच्या परिचयाचे लोक तात्काळ त्यांच्या घरी पोहोचले. तोपर्यंत ४५ वर्षीय संजीव मिश्रा, त्यांची ४२ वर्षीय पत्नी नीलम मिश्रा, १३ वर्षांचा अनमोल आणि सात वर्षांचा सार्थक बेशूद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे गेल्यावर डॉक्टारंनी चौघांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले.
विदिशाचे जिल्हाधिकारी उमाशंकर भार्गव यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, मिश्रा यांच्या दोन्ही मुलांना डीएमडी नावाचा अनुवांशिक आजार होता. ज्याचे उपचार होऊ शकत नाहीत. आम्हाला घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली आहे. ज्यामध्ये मिश्रा यांनी लिहिले की, ते आपल्या दोन्ही मुलांना वाचवू नाही शकत. यासाठी आता त्यांना जगायची इच्छा नाही. मिश्रा यांनी विष पिऊन आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली. तसेच अतिरीक्त पोलिस अधिक्षक सीमर यादव यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणात अधिकचा तपास सुरु केला आहे.
डीएमडी आजार काय असतो
डीएमडी हा आजार स्नायूच्या कमजोरीशी निगडीत आहे. हा एक प्रकारचा अनुवांशिक आणि गंभीरस्वरुपाचा आजार आहे. या आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण हळूहळू खंगत जातो. डीएमडीचा आजार होण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक असते.