Brijbhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाबद्दल पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे एक षडयंत्र आहे आणि त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केला आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं की, “जेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले त्यावेळी मी म्हटलं होतं की, काँग्रेसचे दीपेंद्र हुड्डा आणि भूपेंद्र हुड्डा यांचं हे षडयंत्र आहे. आजही हेच सांगत आहे आणि देशही तेच म्हणत आहे. त्यामुळे यावर आता मला याबद्दल काहीही बोलण्याची गरज नाही”, असा आरोपही त्यांनी केला. उत्तर प्रदेशमधील गोंडा येथील एका सभेला संबोधित करताना ब्रिजभूषण शरण सिंह यांनी हा आरोप केला आहे.

हेही वाचा : ‘सेबी’च्या माधबी बुच यांची झाडाझडती? लोकलेखा समितीकडून चौकशीची शक्यता

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर काय आरोप केले होते?

देशातील प्रसिद्ध कुस्तीपटू महिलांनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. यानंतर या प्रकरणात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयानेही ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप निश्चित केले होते.

विनेश फोगट, बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये जाणार?

हरियाणात ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये कडवी लढत होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक दर्जाचे खेळाडू कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून त्यांच्या भेटीचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

बजरंग पुनिया आणि विनेश फोगट काँग्रेसचे सचिव के.सी.वेणुगोपाल यांनाही भेटणार आहेत. तसंच, विधानसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच ते हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचंही बोललं जात आहे.