Union Minister L Murugan Resigns BJP Cabinet Reshuffle: भाजपाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्री पदाचा आणि राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले आहे. या पत्रात मुरुगन म्हणाले की, तमिळनाडूमध्ये पक्षाला बळकट करण्यासाठी त्यांना पूर्ण वेळ द्यायचा आहे.
एक्सवर पोस्ट शेअर करत मुरुगन यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत माता आणि तमिळनाडूची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराच्या मुलाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो, असेही मुरुगन पुढे म्हणाले.
एल. मुरुगन पुढे म्हणाले की, त्यांना पुन्हा एकदा तळागाळात जाऊन काम करायचे आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तमिळनाडूमध्ये त्यांना पुन्हा एकदा भाजपाला नवी उभारी मिळवून द्यायची आहे. यासाठी ते पूर्णवेळ काम करू इच्छितात, असेही त्यांनी म्हटले. एल. मुरुगन हे भाजपाचे माजी तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष होते. तसेच राज्यसभेवर त्यांची मध्यप्रदेश राज्यातून नियुक्ती झाली होती. २०३० पर्यंत त्यांची राज्यसभेची मुदत होती. मात्र त्यांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल?
न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, दिवाळीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात अनेकांचे मंत्रिपद जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांनीही राज्यसभेतील आपला कार्यकाळ संपल्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तसेच अलीकडेच केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि बी. एल. वर्मा यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यावरही त्यांना पुन्हा राज्यसभेवर अद्याप संधी दिलेली नाही.
केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांच्याकडे दिल्ली भाजपा अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे भाजपाच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या सूत्रानुसार त्यांनाही मंत्रिमंडळातून मुक्त केले जाऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाची अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात मंत्रिमंडळात आतापर्यंत फेरबदल झालेला नाही. दोन महिन्यांपूर्वीच मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर फेरबदल होतील, अशी शक्यता होती. मात्र भाजपामधील सूत्रांनी ही शक्यता फेटाळून लावली होती.
