BJP Reply on Rahul Gandhi PM Modi Hug Remark share Indira Gandhi Photo: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी रचनात्मक काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशनात बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली होती. पंतप्रधान मोदी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मुत्सद्देगिरी न दाखवता केवळ जागतिक नेत्यांना मिठ्या मारतात. मिठ्या मारणे हेच त्यांचे परराष्ट्र धोरण आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर आता भाजपानेही प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी इंदिरा गांधींचा जुना फोटो शेअर करत राहुल गांधींना लक्ष्य केले.

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींचा प्रतिवाद करत असताना इंदिरा गांधींचा जुना फोटो शेअर केला. या फोटोमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि क्युबन क्रांतीचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांची भेट झाल्याचे दिसत आहे. तसेच आणखी एका फोटोत इंदिरा गांधी यांनी पॅलेस्टिनी नेते यासिर अराफत यांची भेट घेतलेली दिसत आहे. तसेच आठ वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वतःच लोकसभेत पंतप्रधान मोदींना मिठी मारल्याचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.

हे तीन फोटो शेअर करताना निशिकांत दुबे यांनी कॅप्शनमध्ये म्हटले, “राहुल गांधीजी या गळाभेटीला जठराग्नी बोलतात की कामाग्नी?”

सोशल मीडियावरही यासंबंधीच्या विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही युझर्सनी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि फिडेल कॅस्ट्रो यांच्या भेटीचा मूळ व्हिडीओही शेअर केला आहे.

राहुल गांधी नेमके काय म्हणाले होते?

काँग्रेसच्या अधिवेशनात बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर गेल्यानंतर जागतिक नेत्यांची गळाभेट घेत असतात. त्यांच्या डोक्यात कुणी हे भरवले माहीत नाही. पण गळाभेट घेणे म्हणजे परराष्ट्र धोरण नाही. यानंतर राहुल गांधी यांनी स्टेजवर उपस्थित असलेले काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना बोलावून गळाभेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करून दाखवली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही टीका

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर टीका केली. ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी काल जो छिछोरेपणा केला, तो अशोभनीय आहे. त्यांनी देशाच्या पंतप्रधानांचा तर अपमान केलाच त्याशिवाय इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखांचा इतक्या खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी अपमान केला. अशी छिछोरगिरी यापूर्वी कुठल्याही नेत्याने केली नव्हती. गल्लीतले नेतेही अशाप्रकारे वागत नाहीत. राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागायला हवी.”