Hubballi BJP Leader Son Death updates : हुबळीमध्ये गुरुवारी रीलचं शूटिंग करत असताना कर्नाटकच्या एका भाजपा नेत्याच्या १५ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झाला. या चित्रीकरणादरम्यान एक ऑडी Q7 कार आणि ओला इलेक्ट्रिक दुचाकी भरधाव वेगाने एकमेकांसमोरून येत होत्या आणि शेवटच्या क्षणी त्यांना वळण घ्यायचे होते. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी मृताची ओळख नमिश संगालद अशी पटवली असून तो हुबळी-धारवाड भागातील राजकारणी वीरभद्रप्पा संगालद यांचा मुलगा आहे. हे रील शूट करत असताना नमिश २०२२ मॉडेलची इलेक्ट्रिक बाईक चालवत होता, जी हुबळीच्या विनायक मिस्किन यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. तर २०१३ मॉडेलची ऑडी Q7 कार (जिची मूळ नोंदणी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील आहे) एक अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमिश म्हैसूरमध्ये इयत्ता नववीत शिकत होता आणि १९ मार्च रोजी उगादी सण साजरा करण्यासाठी हुबळीला घरी आला होता. तो आपल्या मित्रांसोबत गेला होता आणि हुबळीच्या उपनगरात रील शूट करत असताना हा अपघात झाला.
शूट करण्यासाठी ऑडी निष्काळजीपणे चालवली
वीरभद्रप्पा (५२) यांनी कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलावर आपल्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल पोलीस तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, हुबळीच्या उंकाल भागातील शेजावडकर लेआउट या निर्जन ठिकाणी दुपारी ४:३० ते ४:४५ च्या दरम्यान ही घटना घडली. रील शूट करण्यासाठी ऑडी Q7 निष्काळजीपणे आणि वेड्यावाकड्या (झीग-झॅग) पद्धतीने चालवत समोरून येणाऱ्या नमिशच्या इलेक्ट्रिक बाईकला धडक दिली.
अॅक्शन ब्रेक रील बनवताना अपघात
हुबळी पोलिसांनी या अल्पवयीन मुलावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, दुचाकीस्वार मुलाच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हुबळीचे पोलीस आयुक्त एन. शशीकुमार यांनी सांगितले की, “दोन्ही वाहने वेगाने एकमेकांकडे येऊन अचानक ब्रेक लावण्याचा ‘ॲक्शन ब्रेक रील’ बनवत असताना, कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याची दुचाकीला धडक बसली.”
या अपघातातील ऑडी Q7 ची २०१३ मध्ये नोएडामध्ये नोंदणी झाली होती आणि नंतर ती हुबळीतील एका खरेदीदाराला विकण्यात आली होती. २०२२ मध्ये नोएडा आरटीओने धारवाड पश्चिम आरटीओला यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले होते.
