BJP leader son suicide probe : उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका २६ वर्षीय तरुणाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधी त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. मृत्यूपूर्वी या तरुणाने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला असून, त्यामध्ये त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींना आपल्या मृत्यूला जबाबदार धरलं आहे. पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांकडून शारीरिक मारहाण, मानसिक छळ तसंच मालमत्ता तिच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्याने केला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
प्रवल गुप्ता असं मृत तरुणाचे नाव असून, तो भाजपाच्या कंकरखेडा मंडळाचे उपाध्यक्ष राजीव गुप्ता यांचा मुलगा होता. व्हिडीओमध्ये प्रवलने म्हटलं आहे की, “मी आज माझं जीवन संपवणार आहे. एवढा मोठा निर्णय घेण्यामागचं मुख्य कारण म्हणजे माझी पत्नी आणि तिचे कुटुंबीय आहेत.” प्रवलचा विवाह गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी झाला होता.
प्रवलने आरोप केला की, त्याची पत्नी त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना शारीरिक मारहाण करत असे. तसंच मालमत्ता तिच्या नावावर करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत होती. पत्नी मुद्दाम जळलेल्या पोळ्या खायला देत असे आणि त्याबद्दल तक्रार केल्यास त्याच्याशी भांडण करत असे, असाही दावा त्याने केला. याशिवाय आई-वडिलांचं घर सोडून स्वतंत्रपणे राहण्यासाठी ती वारंवार दबाव आणत असल्याचंही त्याने सांगितलं. प्रवलच्या म्हणण्यानुसार, अखेर तो कुटुंबापासून वेगळा झाला आणि पत्नीसोबत स्वतंत्रपणे राहू लागला. मात्र, मुलीचा जन्म झाल्यानंतर त्याला पुन्हा आई-वडिलांच्या घरी परतण्याची इच्छा झाली. त्याच्या या निर्णयाला पत्नीने विरोध केला. तिने शिवीगाळ केली आणि घरी परतण्यावरून वाद निर्माण केल्याचा आरोप त्याने केला.
नवजात मुलगी आणि पत्नीची काळजी घेण्यासाठी प्रवलने आपल्या आईला बोलावलं होतं. त्यावेळी पत्नीने आपल्या आईलाही मारहाण केल्याचा आरोप त्याने केला. स्वतःचा संपूर्ण पगार पत्नीच्या हातात देत असूनही ती त्याच्या आई-वडिलांशी गैरवर्तन करत असल्याचं त्याने म्हटलं. तसंच आईसोबत घरी आलेल्या बहिणीच्या चारित्र्यावरही पत्नी संशय घेत असल्याचा आरोप त्याने केला.
गाझियाबाद येथील एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या प्रवलने पुढे आरोप केला की, वडिलांच्या सांगण्यावरून त्याला खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी देत होती. बनावट आरोप करून अनेक गुन्हे दाखल करण्याची धमकी सासरच्या मंडळींकडून वारंवार दिली जात असल्याचा दावाही त्याने केला. ३१ ऑक्टोबर रोजी प्रवल आणि त्याच्या कुटुंबीयांना पोलीस लाईन्समधील कौटुंबिक समुपदेशन केंद्रात समुपदेशनासाठी बोलावण्यात आलं होतं. या प्रक्रियेचा उल्लेख करताना प्रवलने सांगितलं की, पत्नीने त्याच्यावर दारू किंवा अमली पदार्थांचे सेवन करणं, तिला मारहाण करणं आणि शिवीगाळ करणं असे आरोप केले होते. मात्र, त्याने हे आरोप फेटाळून लावत पत्नीच आपल्याला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा प्रत्यारोप केला होता.
१ नोव्हेंबर रोजी प्रवलने विषारी पदार्थ सेवन केल्याचे सांगण्यात येत आहे. मेरठमधील कॅन्टोन्मेंट परिसरात तो बेशुद्धावस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याची ओळख पटवली आणि कुटुंबीयांना माहिती दिली. त्याला सुरुवातीला कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्याला पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पत्नीविरोधात कारवाई करण्याची आई-वडिलांची मागणी
प्रवलच्या मृत्यूमुळे त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील राजीव गुप्ता यांनी सांगितलं की, वर्षभरापूर्वी याच दिवशी त्यांनी मुलाची लग्नाची वरात काढली होती. मात्र, आता त्याच दिवशी मुलाच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा वरातीत सहभागी होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या विचाराने त्यांनी भावूक होत आपलं दुःख व्यक्त केलं.
प्रवलची आई किरण गुप्ता यांनीही सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. मुलाला आई-वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी सून वारंवार दबाव टाकत असल्याचा दावा त्यांनी केला. प्रवलने पत्नीला पुन्हा घरी येण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला असता तिने नकार दिला. तसंच त्याला, ‘तुला मरायचं असेल तर मरून जा’, असं म्हटल्याचा आरोपही किरण यांनी केला.
सून घरातील कामांमध्ये कोणताही सहभाग घेत नव्हती. बंद खोलीत तासन्तास मोबाईलवर बोलत बसत असे, असाही आरोप त्यांनी केला. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच आपल्या नातीचा सांभाळ करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
पोलिसांनी काय सांगितलं?
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी शिव ठाकूर यांनी सांगितलं की, १ नोव्हेंबर रोजी कंकरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तपासादरम्यान प्रवलचे लग्न सुमारे वर्षभरापूर्वी झाले होते आणि त्याचे पत्नीशी वैवाहिक वाद सुरू असल्याचं समोर आलं. या दाम्पत्याचे पोलीस लाईन्समधील कौटुंबिक समुपदेशन केंद्रात समुपदेशनही सुरू होते. “या प्रकरणातील सर्व बाजूंचा तपास केला जात आहे. लवकरच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असं शिव ठाकूर यांनी सांगितले.
