BJP leader Suvendu Adhikari’s PA shot dead: ममता बॅनर्जी यांना नमवत जायंट किलर ठरलेले भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधल्या माध्यमग्राम इथे हा प्रकार घडला. चंद्रकांत रथ असे त्यांचे नाव असून, हल्ल्यानंतर त्यांना डायव्हिर्सिटी नर्सिंग होम इथे नेण्यात आलं. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता मिळवली होती. प्रदीर्घ काळानंतर तृणमूल काँग्रेस पक्ष सत्तेबाहेर गेला. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. यावरून राजकीय तिढा सुरू असतानाच हा प्रसंग घडला आहे.
भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएवर गोळ्या झाडल्याचा प्रसंग कधी, कुठे आणि कसा घडला?
रथ आपल्या गाडीतून जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. चारपैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. संशयितांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. गाडी हळू होताच त्यांनी रथ यांच्यावर हल्ला केला. रथ, सुवेंदू यांच्याबरोबर गेली अनेक वर्ष काम करत होते. अधिकारी यांच्या राजकीय समन्वयाचं काम ते पाहत असत. रथ यांच्याबरोबर असलेले बुद्धदेब हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रथ स्वत: गाडी चालवत होते. हल्ला झाला तेव्हा ते सुवेंदू यांच्याबरोबर नव्हते. भाजपा नेते दिब्येंदू अधिकारी यांनी या हल्ल्याच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
‘हा हल्ला म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या इतक्या वर्षांच्या हिंसक संस्कृतीचं द्योतक आहे. रठ यांची निर्घूणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा सखोल तपास व्हायला हवा. या हल्ल्यामागे मोठा कट असण्याची शक्यता आहे’, असं भाजपा नेते निखील प्रसून यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.
दरम्यान ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या माध्यमग्राम मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे रतीन घोष २३९९ मतांनी निवडून आले. सुवेंदू अधिकारी यांनी भांबिनापूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा १५,००० मतांनी पराभव केला. सुवेंदू यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रथ बरसात इथे आपल्या घरी परतत होते तेव्हा हा हल्ला झाला. ‘आम्ही उभे असताना अचानक आम्ही गोळ्यांचा आवाज ऐकला. आम्ही धावत गेलो. त्यावेळी बाईकवरून दोनजण पळून गेले’, असं प्रत्यक्षदर्शी सुकुमार दास यांनी सांगितलं. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, तपासाला सुरुवात केली आहे.
‘थोड्या वेळापूर्वी दोघांना रुग्णालयात आणण्यात आलं. एकाचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या व्यक्तीच्या हाताला गोळी लागली होती. त्याला आम्ही वाचवू शकलो आहोत’, असं डॉक्टरांनी सांगितलं.
चाळिशीतले रथ हे सुवेंदू यांची सावली असल्याप्रमाणे असायचे. राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी ते भारतीय हवाई दलात कार्यरत होते. सुवेंदू यांचे राजकीय डावपेच ठरवण्यात रथ यांचा मोठा वाटा होता.
