नवी दिल्ली: नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेने व्यथित झाल्याची प्रतिक्रिया भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी दिली आहे. या कायद्यांचे फायदे शेतकऱ्यांना समजून सांगण्यात भाजप कार्यकर्त्यांना अपयश आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी गेल्या आठवडय़ात हे कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यावर ट्विटरद्वारे प्रतिक्रिया देताना उमा भारती यांनी आपण शेतकऱ्यांना समजून देण्यात का अपयशी ठरलो? असा सवाल केला आहे.  पंतप्रधान कोणत्याही गोष्टींबाबत सखोल चिंतन करतात असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांचा हा निर्णय धक्कादायक होता. त्यामुळे प्रतिक्रिया देण्यास विलंब झाल्याचे  त्यांनी सांगितले. शेतकरी कुटुंबातून आल्याचे सांगताना, सरकार कोणतेही असो, आज देशातील शेतकरी पूर्णपणे समाधानी आहेत असे दिसत नाही. माझे दोन मोठे भाऊ आजही शेतीवर अवलंबून आहेत. त्यांच्याशी आणि माझ्या गावातील शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असते. खते, बी-बियाणे तसेच वेळेत वीजपुरवठा आणि त्यांच्या अटीवर बाजारात अन्नधान्य विकण्याची संधी मिळाल्यास शेतकरी आनंदी होईल, असे मतही उमा भारती यांनी व्यक्त केले आहे.