पार्टी विथ डिफरन्स हे बिरूद मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कथनी आणि करणीमध्ये काहीच फरक राहिलेला दिसत नाही. ज्या मुद्द्यांवरून काँग्रेस सरकारच्या काळात भाजपने आरडाओरड केली होती. त्याच मुद्द्यांवर काँग्रेसचाच कित्ता भाजपने गिरवला असल्याचे उघड झाले आहे. देशातील नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या स्वतंत्र संचालक पदावर भाजपने आपल्याच पक्षाच्या नेत्यांची नियुक्ती करण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने ज्या नावांना मंजुरी दिली आहे, त्यामध्ये किमान दहा नावे ही भाजपशी संबंधित व्यक्तींची आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील देशातील नामांकित कंपन्यांचे स्वतंत्र संचालक म्हणून या नावांची निवड करण्यात आलीये.

भाजपच्या दिल्ली विभागाच्या उपाध्यक्ष शाजिया इल्मी, गुजरातमधील पक्षाच्या आयटी सेलचे निमंत्रक राजिका कचेरिया, गुजरातमधील पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या नेत्या असिफा खान, ओडिशातील माजी आमदार सुरामा पाधी आणि बिहारमधील माजी आमदार किरणघई सिन्हा यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांची सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपन्यांचे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या कंपन्यांमध्ये इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नॅशनल अॅल्युमिनिअम कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे.

या कंपन्यांच्या कार्यकारी संचालनासाठी आवश्यक नियम ४९ मध्ये सेबीने २०१४ मध्ये बदल केले होते. या बदलानुसार, प्रत्येक कंपनीच्या संचालक मंडळामध्ये किमान ५० टक्के संचालक हे अकार्यकारी असावेत. ज्यामध्ये किमान एका महिला संचालकाचा समावेश असावा, असे बंधन घालण्यात आले होते. शाजिया इल्मी यांची इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडच्या स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे स्वतंत्र संचालक म्हणून कचेरियांची नियुक्ती करण्यात येईल. नाल्कोचे स्वतंत्र संचालक म्हणून किरणघई सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाच्या कर्नाटक प्रांताचे सचिव भारती मगदूम, आंध्र प्रदेशमधील महिला मोर्चाच्या प्रमुख सरनाला मलाथी राणी, आसाममधील नेत्या सिप्रा गून, दिल्लीतून निवडणूक लढविलेल्या शिखा रॉय यांचीही स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान या नियुक्तींबद्दल आपल्यापर्यंत काही पत्रव्यवहार झालेला नसल्याचे सार्वजनिक क्षेत्रातील विविध कंपन्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.