पश्चिम बंगालमध्ये झालेला भाजपाचा पराभव सुवेंदू अधिकारी यांच्या जिव्हारी लागला आहे. विरोधी पक्षनेते असणाऱ्या भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी अती आत्मविश्वास असणाऱ्या नेत्यांना बंगालमधील पराभवासाठी जबाबदार धरलं आहे. काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळेच पक्षाला फक्त १७० जागा मिळाल्या असं सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे. चांदीपूर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांनी अती आत्मविश्वासामुळे मूळ जमिनीवर असणारी परिस्थिती समजून घेता आली नाही असं सुनावलं आहे.

“विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांध्ये आपण चांगली कामगिरी केली. मात्र यानंतर आपल्या काही नेत्यांनी अती आत्मविश्वास वाटू लागला. त्यांना भाजपा १७० ते १८० जागा सहज मिळवेल असा विश्वास वाटू लागला. पण यावेळी त्यांनी जमिनीवरील परिस्थिती कोणतीही माहिती घेतली नाही. याचा आपल्याला खूप मोठा फटका बसला,” असं सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे.

आपलं लक्ष्य ठरवत असताना जमिनीवर काम करणंही तितकंच महत्वाचं आहे. ही सत्य परिस्थिती असून यासाठी कठोर श्रम गरजेचे आहेत असं सुवेंदू अधिकारी यांनी सांगितलं.

सुवेंदू अधिकारी यांच्या या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसचे कुणाल घोष यांनी प्रतिक्रिया दिली असून, “मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या कल्याणकारी प्रकल्प आणि विकासाच्या कामांचा सुवेंदू अधिकारी यांना सोयीस्करपणे विसर पडला आहे. भाजपा स्वप्नात जगत आहे, कारण त्यांच्या अनेक नेत्यांनी २०० हून अधिक जागा मिळतील असं वाटलं होतं. ते इतरांमध्ये दोष का शोधत आहेत? सुवेंदू अधिकारी यांनीदेखील १८० जागा मिळातील असं वारंवार म्हटलं होतं. खरं तर त्यांनी बंगालची मुख्य नाडी माहिती नाही, जी तृणमूल काँग्रेसला माहिती आहे,” अशी टीका केली आहे.