scorecardresearch

Video: “…मग अदाणी कुणाचे मित्र झाले?” मनोहर पर्रीकरांचा जुना व्हिडीओ व्हायरल; विधानसभेतच काँग्रेसला सुनावलेलं!

मनोहर पर्रीकरांनी गौतम अदाणी प्रकरणावरून काँग्रेसला भर विधानसभेतच सुनावल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

manohar parrikar old video on gautam adani
मनोहर पर्रीकरांचा जुना व्हिडीओ व्हायरल! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गेल्या काही दिवसांपासून भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी आणि त्यांच्या अदाणी उद्योग समूहाची जोरदार चर्चा चालू आहे. हिंडेनबर्ग रीसर्चच्या अहवालामध्ये अदाणींनी शेअर बाजारात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यानंतर अदाणी उद्योग समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स पडू लागले आहेत. या घटनाक्रमाचा अदाणी उद्योग समूहाला मोठा फटका बसला असून एका अंदाजानुसार त्यांची संपत्ती १४० बिलियन डॉलर्सने घटल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात विरोधकांकडून गौतम अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपा यांच्या कथित मित्रत्वाच्या संबंधांवरून रान पेटवलं जात आहे. त्यात आता भाजपाचे दिवंगत नेते आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अदाणी उद्योगसमूहावर ठेवण्यात आलेल्या ठपक्यानंतर देशांतर्गत सेबीसारख्या नियंत्रक संस्थांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. तसेच, मोदी आणि भाजपाशी मित्रत्वाचे संबंध असल्यामुळेच अदाणींना अभय मिळालं असल्याचीही टीका विरोधकांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपा आणि खुद्द अदाणी समूहाकडूनही वारंवार अशा प्रकारच्या कोणत्याही मित्रत्वाच्या संबंधांचा फायदा किंवा झुकतं माप अदाणी समूहाला मिळालं नसल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनोहर पर्रीकरांचा जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यामुळे नव्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नसून तो २०१५नंतरचाच असावा असं व्हिडीओतील पर्रीकरांचं भाषणावरून दिसून येत आहे. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनी गोवा विधानसभेत केलेल्या भाषणााचा हा व्हिडिओ आहे. या भाषणात गौतम अदाणींचे भाजपाशी मित्रत्वाचे संबंध असल्याच्या काँग्रेसच्या टीकेचा मनोहर पर्रीकर समाचार घेत असल्याचं दिसून येत आहे. यावेळी गोव्यातील मोर्मूगाव पोर्टचं कंत्राट अदाणींना कसं मिळालं? याविषयी मनोहर पर्रीकर आपल्या भाषणात भाष्य करत असल्याचं दिसून येत आहे.

काय म्हणाले मनोहर पर्रीकर?

“दिगंबर कामत यांनी ९ नोव्हेंबर २००९ रोजी दिलेल्या पत्रामध्ये याबाबत नमूद करण्यात आलं आहे. त्यात त्यांनी अदाणींसोबत अदाणी मोर्मूगाव पोर्ट टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड झाल्याचा करार झाल्याचं नमूद केलंय. याच अदाणींना तुम्ही भाजपाचे जवळचे मित्र म्हणता. त्यांना सर्व आदेश तुमच्या कार्यकाळात मिळाले आहेत. १५ मे २०१० रोजी या विमानतळाच्या प्रकल्पाला हिरवा झेंडा राज्य सरकारकडून देण्यात आला. नरेंद्र मोदी तेव्हा पंतप्रधान नव्हते. गोव्यात तेव्हा भाजपाचं सरकारही नव्हतं”, असं पर्रीकर या व्हिडीओतील भाषणात बोलताना दिसत आहेत.

Tech Layoffs: Zoom कंपनी करणार १३०० कर्मचाऱ्यांची कपात; सीईओंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

“ही सगळी कामं काँग्रेसच्या कार्यकाळात अडाणींना देण्यात आली. मग ते कुणाचे मित्र झाले? आमचे मित्र झाले का? त्यांनी या प्रकल्पाचं काम मार्च २०१४ ला पूर्ण केलं.२०१०ला प्रकल्प सुरू केला होता, चार वर्षं लागली तो पूर्ण व्हायला’, असंही पर्रीकरांनी यात नमूद केलं आहे.

दरम्यान, अदाणी समूह आणि भाजपा यांच्या कथित मित्रत्वाच्या संबंधांवरून टीका होत असताना दुसरीकडे आता हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 10:57 IST