अडवाणी, सिन्हा, जोशींमध्ये चर्चेच्या फेऱ्या; गडकरींचे घूमजाव, नायडूंचा सौम्य पवित्रा
बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान व स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध भाजपमध्ये सुरू झालेली खदखद शुक्रवारीही कायम असून आणखी काही खासदारांनी प्रचारतंत्रावर उघड टीका केली आहे. असंतोषाला वाचा फोडणारे लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्याशी ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी शुक्रवारी स्वतंत्र चर्चा केली, तर शहांवर टीका करणाऱ्यांवर कारवाई करा, असे मी म्हणालोच नाही, असा दावा नितीन गडकरी यांनी केला. ज्येष्ठांनी आपली मते जाहीरपणे मांडायला नको होती, असे सांगत त्यांच्या सल्ल्यांचा आम्ही गंभीरपणे विचार करूच, असा सौम्य पवित्रा व्यंकय्या नायडू यांनी घेतला.
अडवाणी, डॉ. जोशी, यशवंत सिन्हा किंवा शांताकुमार यांच्यावर कारवाई करावी, असे मी म्हणालोच नाही. काही माध्यमांत तसा अपप्रचार झाला आहे, असा दावा गडकरी यांनी केला.
अडवाणी आणि जोशी हे आमचे अत्यंत आदरणीय नेते आहेत. पक्षवाढीत त्यांचा मोठा वाटा आहे. मी अथवा पक्षातील कुणीही त्यांच्याविषयी अनादराची भावना दर्शविलेली नाही की कारवाईची मागणी केलेली नाही, असेही गडकरी यांनी नमूद केले.
ज्येष्ठांनी मोदींविरुद्ध नव्हे तर बिहारमधील धोरणाबद्दल टीका केली आहे, असा दावा व्यंकय्या नायडू यांनी केला. काही प्रसिद्धी माध्यमांनी ज्येष्ठांच्या पत्राचा अतिरंजित वापर केला, असा आरोपही त्यांनी केला. अर्थात ज्येष्ठांनी पक्षाच्या व्यासपीठावर आपली मते मांडायला हवी होती, जाहीर पत्र लिहिणे योग्य नव्हते, असेही नायडू म्हणाले. असे असले तरी त्यांच्या मतांचा आम्ही गांभीर्याने विचार करूच, असेही त्यांनी सांगितले.
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मात्र ज्येष्ठांची पाठराखण केली आहे. अडवाणी आणि जोशी हे अनुभवी नेते आहेत आणि पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी भरपूर काम केले आहे. त्यांचे म्हणणे पक्षनेतृत्वाने ऐकलेच पाहिजे, असे सिंह म्हणाल्याचे पक्ष सूत्रांकडून समजते.

‘मार्गदर्शकां’चे बळ वाढले!
ऐन दिवाळीत भाजपमध्ये मार्गदर्शक मंडळ विरुद्ध मोदी-शहा समर्थकांमध्ये वादाचे फटाके फुटू लागले आहेत. बिहारमधील दारुण पराभवावरून ज्येष्ठांनी थेट मोदी व शहा यांना जबाबदार धरले. त्यामुळे भाजपमध्ये दोन पिढय़ांमधील संघर्ष तीव्र झाला आहे. मार्गदर्शक मंडळाची गेल्या वर्षभरात एकदाही बैठक झाली नाही. मंडळातील नेत्यांना महत्त्व नाही. त्यामुळे बिहारची संधी साधून ज्येष्ठ नेत्यांनी पत्रक काढून बॉम्बगोळा टाकला. त्यानंतर बिहारमधील खासदार उघडपणे शहा यांच्याविरोधात बोलू लागले आहेत. ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर हा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
सिन्हा यांची चर्चा
यशवंत सिन्हा यांनी शुक्रवारी अडवाणी व डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. या चर्चेचा तपशील सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.