वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारे भाजपचे खासदार गिरीराज सिंह यांनी यावेळी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वर्णावरून अजब तर्कट मांडले आहे.
सोनिया गांधींचा वर्ण गोरा नसता तर, काँग्रेसने त्यांना स्विकारले असते का? अशी मुक्ताफळे गिरीराज सिंह यांनी उधळली आहेत. बिहारमधील स्थानिक पत्रकारांनी राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर गिरीराज सिंह यांना प्रश्न विचारला होता. याबाबत बोलताना गिरीराज यांनी बेताल वक्तव्य केले. ते म्हणाले की, “राजीव गांधींनी नायजेरियन मुलीशी विवाह केले असते तर काँग्रेसने तिला स्वीकारले असते का?” गिरीराज सिंह यांच्या विधानाचा व्हिडिओ स्थानिक वृत्त वाहिन्यांकडून दाखवला जात आहे. तसेच सिंह यांच्या वर्णद्वेषी विधानाची त्यांच्यासोबत उपस्थित मजा घेताना व्हिडिओत दिसतात. विधानातून गिरीराज सिंह यांचा रोख सोनिया गांधी यांच्यावर होता. सोनिया गांधी या गो-या असल्याने त्यांना काँग्रेसने अध्यक्ष म्हणून स्वीकारले असे गिरीराज सिंह यांचे म्हणणे होते.   
केंद्रीय मंत्र्यांने महिलांच्या वर्णावरुन असे बेजबाबदार विधान करणे दुर्दैवी असून गिरीराज सिंह यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तर, पंतप्रधान मोदींनी गिरीराज यांना अशाप्रकारची विधानं करण्यासाठीत मंत्रीमंडळात स्थान दिले असल्याचा टोला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे.