Kiren Rijiju Reaction on Naseeruddin Shah Dimagi Naxal Statement: ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये स्वतःचा उल्लेख ‘दिमागी नक्षल’ असा केल्याने नवा वाद पेटला आहे. या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी नसीरुद्दीन शाह यांच्यावर जोरदार टीका केली. “ते एवढे घातक असतील हे मला ठाऊक नव्हते,” असा टोला लगावत रिजिजू यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

रिजिजू यांनी ‘एक्स’वर लिहिले, “मला वाटले होते की, नसीरुद्दीन शाह हे केवळ एक अभिनेते आहेत. मी त्यांचा आदर करत होतो आणि ते मला आवडायचे… मात्र ते एक घातक ‘अर्बन दिमागी नक्षल’ असतील, याची मला कल्पना नव्हती!”

याच पोस्टमध्ये त्यांनी हिंदीतही काही मजकूर लिहिला. “शाह यांचा खरा चेहरा खूप उशिरा समोर आला असून हे भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे”, असे त्यांनी नमूद केले.

नेमका वाद काय?

विद्यार्थ्यांची आंदोलने, दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया आणि जंतरमंतर येथील निदर्शने, तसेच मुंबईतील विद्यार्थी आंदोलनांना नसीरुद्दीन शाह यांनी वारंवार जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्यांनी आपल्या भूमिकेवरून कारवाई करण्याचे थेट आव्हान सत्ताधाऱ्यांना दिले आहे.

या व्हिडिओमध्ये नसीरुद्दीन शाह म्हणतात, “मी अभिमानाने सांगतो… मी ‘दिमागी नक्षल’ आहे. याशिवाय त्यांनी माझ्यासारख्या लोकांना देशद्रोही, तुकडे-तुकडे गँग आणि आणखी कोणकोणती विशेषणे लावली आहेत, हे माहीत नाही. जर या देशात खरंच तुकडे-तुकडे गँग असेल, तर ती ही बेकायदेशीर राजवट आहे.”

अभिनेते शाह पुढे म्हणाले, “मला या सरकारला एकच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही अजून काय करणार आहात? आपल्या देशातील तरुणांचे मनोधैर्य खचवण्यासाठी, शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी आणि आपल्या लोकशाहीला धोक्यात आणण्यासाठी तुम्ही अजून किती खालच्या थराला जाणार आहात?”

नसीरुद्दीन शाह यांच्या या आक्रमक विधानानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून केंद्रीय मंत्र्यांच्या प्रत्युत्तरानंतर हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.