Jamal Siddiqui Statement: सर्व मुस्लीम हे प्रभू श्रीरामाचे वंशज असल्याचं विधान भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक संघटनेचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावरून सध्या चर्चा चालू असून त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये जमाल सिद्दिकी यांनी हे विधान केलं आहे. याशिवाय, मुस्लीम धर्माचं मूळ, हिंदू देवी-देवतांचं मुस्लीम प्रथांमधील स्थान आणि भारतात राहणाऱ्या विविध समुदायांचा एकमेकांमध्ये गुंफलेला वारसा यासंदर्भातदेखील जमाल सिद्दिकी यांनी यावेळी भूमिका मांडली.

काय म्हणाले जमाल सिद्दिकी?

सनातन धर्म हा इस्लमा धर्माच्याही खूप आधी अस्तित्वात आला, तो मानवी संस्कृतीचा पाया आहे, असं विधान जमाल सिद्दिकींनी केलं. “सनातन धर्म इस्लामच्या खूप आधी अस्तित्वात आला. ज्या मुस्लिमांचा राम किंवा कृष्ण यांच्यावर विश्वास नाही, त्यांना मुस्लीम म्हणताच येणार नाही”, असं म्हणत सिद्दिकी यांनी इस्लाममध्ये अनेक प्रेषितांचा उल्लेख करण्यात आल्याचा दावा केला.

“कुराणमध्ये २५ प्रेषितांचा उल्लेख आहे. पण हदीथ आणि इस्लामिक परंपरांनुसार जगभरात १ लाख २५ हजार प्रेषित पाठवण्यात आले होते. मग आपण असं कसं म्हणू शकतो की प्रभू श्रीराम व प्रभू कृष्ण हे त्यांच्यापैकीच एक नव्हते? ते इश्वराचेच दूत होते”, असंही जमाल सिद्दिकी यांनी म्हटलं आहे. याशिवाय, “सर्व मुस्लीम हे प्रभू श्रीरामाचेच वंशज आहेत”, असं विधानही त्यांनी केलं.

“प्रार्थनेची पद्धत बदलली असली, तरी…”

दरम्यान, हिंदू व मुस्लीम धर्मीयांची प्रार्थनेची पद्धत बदलली असली, तरी संस्कृती एकच असल्याचंही सिद्दिकी म्हणाले. “दोन्ही धर्मातील लोकांची प्रार्थना करण्याची पद्धत जरी वेगळी असली, तरी मूळ संस्कृती एकच आहे. आपली ओळख अजूनही सनातनी अशीच आहे”, असं विधान सिद्दिकी यांनी केलं आहे. सिद्दिकी यांच्या या विधानावर आता चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या दाव्यांवर दावे-प्रतिदावे केले जात असून त्यासंदर्भात भाजपाकडून अद्याप अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींच्या यशावर चर्चा करणार – जमाल सिद्दिकी

दरम्यान, मोदी सरकारने सत्तेत ११ वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर जमाल सिद्दिकी यांनी पीटीआयला प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही अल्पसंख्याक समुदायांमध्ये जाऊन मोदींनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीवर चर्चा करणार आहोत. मोदी सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ घेण्यात अल्पसंख्याक समुदायाला काही अडचणी येत आहेत का? याचाही आढावा आम्ही घेऊ. आम्ही लोकांच्या भेटीगाठी घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू, प्रश्न विचारू आणि त्यांना खात्री देऊ की हे सरकार त्यांचं सरकार आहे”, असं जमाल सिद्दिकी म्हणाले आहेत.