शिवपुरी (मध्य प्रदेश) – मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. भाजप आमदार प्रीतम लोधी यांचा मुलगा दिनेश लोधी याने आपल्या भरधाव ‘थार’ गाडीने पाच जणांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर मदत करण्याऐवजी आरोपीने जखमींनाच सुनावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ७:३० च्या सुमारास ही घटना घडली. संजय परिहार, आशिष परिहार आणि अंशुल परिहार हे तिघे दुचाकीवरून कामासाठी थानरा गावाकडे जात होते. त्याचवेळी सीता वर्मा आणि पूजा सोनी या दोन महिला रस्त्यावरून पायी चालत होत्या. मागून आलेल्या भरधाव थार (SUV) गाडीने या पाचही जणांना जोरदार धडक दिली. या गाडीवर ‘आमदार’ आणि ‘प्रीतम लोधी’ अशी पाटी लावलेली होती.

अपघातानंतरचा उद्धटपणा

या अपघाताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अपघातानंतर जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना, दिनेश लोधी त्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्याशी वाद घालताना दिसला. “मी सायरन वाजवत होतो, मग तुम्ही बाजूला का झाला नाहीत?” असा निर्लज्ज सवाल त्याने जखमींना केला. इतकेच नव्हे तर, घटनास्थळी व्हिडिओ बनवणाऱ्या नागरिकांनाही त्याने “व्हिडिओ बनवू नको बेटा,” असा धमकी वजा इशारा दिला.

जखमींची प्रकृती आणि पोलीस कारवाई

या अपघातात पाचही जणांच्या डोक्याला, खांद्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. करैरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

“आमदारासाठी जनता महत्त्वाची, कुटुंब नाही”

या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार प्रीतम लोधी यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले की, “कायद्यासमोर सर्व समान आहेत. माझ्यासाठी माझे कुटुंब नाही, तर जनता प्रथम आहे. पोलिसांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी आणि पीडितांना न्याय मिळवून द्यावा.”

सत्तेच्या नशेत सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या मुलांवर आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांमध्ये या घटनेमुळे तीव्र संतापाची लाट उसळली आहे.